‘खाशाबा’मधील नव्या चेहऱ्याची चर्चा; नागराज मंजुळेंची पत्नी गार्गी कुलकर्णी झळकणार

Gargi Kulkarni: नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘खाशाबा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटात महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी यांच्यासह स्वतः नागराज मंजुळेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र टीझरमधील एका नव्या चेहऱ्यानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

या चित्रपटातून नागराज मंजुळे यांच्या पत्नी गार्गी कुलकर्णी रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. विशेष म्हणजे, नागराज आणि गार्गी हे पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

गार्गी कुलकर्णी या मूळच्या अहमदनगरच्या असून २०१७ मध्ये त्यांचा आणि नागराज मंजुळे यांचा विवाह झाला. त्या चित्रपट निर्मिती, वेशभूषा आणि क्रिएटिव्ह रायटिंग या क्षेत्रांमध्ये सक्रिय आहेत. प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या गार्गी यांनी आतापर्यंत पडद्यामागे अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

त्यांनी ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘घर बंदूक बिर्याणी’ आणि ‘नाळ २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये कार्यकारी निर्मिती आणि वेशभूषा विभागात काम केले आहे. तसेच नागराज मंजुळे यांच्या निर्मिती संस्थेच्या कामकाजातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

एका मुलाखतीत नागराज मंजुळे यांनी गार्गी यांना वाचन आणि कवितेची विशेष आवड असल्याचे सांगितले होते. त्या स्वतः कविता लिहितात आणि साहित्याची चांगली जाण असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक नव्या चित्रपटाची पटकथा सर्वप्रथम गार्गी यांनाच वाचायला दिली जाते, असेही त्यांनी सांगितले होते.

गार्गी कुलकर्णी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारशा दिसत नाहीत. मात्र ‘खाशाबा’ चित्रपटातून त्या पहिल्यांदाच अभिनय करत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत आणि नागराज मंजुळेंसोबतच्या त्यांच्या पहिल्या ऑनस्क्रीन उपस्थितीबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page