सन पिक्चर्सने 5 ऑक्टोबर रोजी ‘जेलर 2’चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित केला. चित्रपटाच्या रिलीजला काही दिवसच बाकी असताना ट्रेलरमधून कथानकाची आणि नव्या कलाकारांची झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.
पहिल्या ‘जेलर’मध्ये निवृत्त तुरुंग अधिकारी मुथुवेल पांडियन यांच्या आयुष्यात मुलगा बेपत्ता झाल्यानंतर मोठा बदल घडतो. आता दुसऱ्या भागात त्यांच्यासमोर आणखी मोठं आणि धोकादायक मिशन असणार असल्याचं ट्रेलरवरून दिसत आहे.
रजनीकांत यांचा दमदार अंदाज, अॅक्शन सीक्वेन्स आणि त्यांची खास स्टाइल ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे मुथुवेल पांडियन पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं स्पष्ट होतं.
‘जेलर 2’च्या स्टारकास्टमध्ये अनेक नव्या कलाकारांची भर पडली आहे. रजनीकांत यांच्यासोबत एस. जे. सूर्या, मिथुन चक्रवर्ती, विद्या बालन, सूरज वेंजारामूडू, अण्णा राजन आणि जतीन सरना दिसणार आहेत. रम्या कृष्णन, योगी बाबू, मिर्ना आणि ऋत्विक हे कलाकारही त्यांच्या भूमिकांमध्ये परतले आहेत.
चित्रपटातील विशेष कलाकारांच्या एन्ट्रीनेही लक्ष वेधलं आहे. शिव राजकुमार ‘नरसिंह’च्या भूमिकेत दिसतात. तर मोहनलाल ‘मॅथ्यू’ या अंडरवर्ल्ड बॉसच्या भूमिकेत पुन्हा एकदा दिसणार आहेत. जॅकी श्रॉफही ‘क्यूपिड’च्या भूमिकेत परतले आहेत.
विद्या बालनचा लूकही ट्रेलरमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. साडीतील तिचा अंदाज डॅशिंग आणि रहस्यमय दिसतो. एका दृश्यात ती रजनीकांत यांच्यासोबत डायनिंग टेबलवर गप्पा मारताना दिसते. मात्र तिच्या भूमिकेबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
एस. जे. सूर्या यांच्या भूमिकेबाबतही उत्सुकता आहे. ट्रेलरमधील काही दृश्यांमुळे ते चित्रपटात खलनायकाच्या किंवा प्रतिनायकाच्या भूमिकेत असू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, ‘जेलर 2’मध्ये शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांचे स्पेशल अपिअरन्स असू शकतात, अशीही चर्चा आहे. मात्र त्यांच्या सहभागाची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
चित्रपटासाठी अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिलं आहे. प्रमोशनदरम्यान अल्बममधील चार गाणी रिलीज करण्यात आली आहेत. त्यामध्ये नोरा फतेहीच्या ‘बिंदास’ या विशेष गाण्याचाही समावेश आहे.
आता ट्रेलर रिलीज झाल्यानंतर रजनीकांत यांना पुन्हा मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘जेलर 2’ 15 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
