मराठी नाटक पाहून पंकज त्रिपाठी म्हणाले ‘अद्भुत’, काय आहे त्या नाटकाचं खास?

मराठी रंगभूमीवर सध्या वेगवगळ्या धाटणीची नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आणि आता या नाटकांची भुरळ बॉलिवूड कलाकारांनाही पडू लागली आहे.

याचा साक्षीदार म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचा लोकप्रिय अभिनेता पंकज त्रिपाठी. मराठी रंगभूमीवर सादर होणाऱ्या एका अनोख्या नृत्यनाटकाने त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांनी त्याला ‘अद्भुत’ अशी विशेष दाद दिली.

हे नाटक म्हणजे एक तिची गोष्ट. नुकताच या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग पार पडला आणि खास या प्रयोगाला पंकज त्रिपाठी यांनी उपस्थिती लावली.

नृत्य, अभिनय आणि भावनांचा सुंदर मिलाफ असलेल्या या नृत्यनाट्याने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्रयोगाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी कलाकारांच्या सादरीकरणाचं मनापासून कौतुक केलं.

हिंदी सिनेसृष्टीतील अशा प्रतिभावान कलाकाराकडून मिळालेली ही शाबासकी म्हणजे संपूर्ण टीमसाठी मोलाची पावतीच असल्याचं कलाकारांनी म्हटलंय.

‘एक तिची गोष्ट’नं अलीकडेच २५ प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स आणि पी एस डी जी स्टुडिओज प्रोडक्शन यांच्या संयुक्त निर्मितीत हे नाटक साकारलं आहे.

नाटकाचं लेखन विराजस कुलकर्णी यांचं असून दिग्दर्शन सूरज पारसनीस आणि विराजस कुलकर्णी यांनी केलंय. गौरी कालेलकर-चौधरी, सिद्धेश चौधरी आणि फुलवा खामकर यांची यात निर्मिती आहे.

रंगभूमीवर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि त्यांची कन्या आस्मा खामकर, तसेच ओमकार गोखले यांचा कलाविष्कार रसिकांना अनुभवायला मिळतो.

पंकज त्रिपाठींसोबतच अनेक मान्यवरांनीही या नाटकाचं कौतुक केलंय. अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी हे नाटक सकारात्मकतेची नवी ऊर्जा देत आयुष्याला नव्या रंगांनी सजवणारा अनोखा अनुभव असल्याची भावना व्यक्त केली.

“संपूर्ण प्रयोग फॅन्टास्टिक होता!” असं बॉलिवूडचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर यांनी म्हणत नाटकाला भरभरून दाद दिली.

या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी, संदीप सोपारकर, उर्मिला कानिटकर, मनवा नाईक, स्मिता तांबे, शर्वरी पाटणकर, उमेश जाधव, सुशांत शेलार, मृणाल देशपांडे, दीपा चौधरी आणि सुखदा खांडकेकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

२५ प्रयोगांचा यशस्वी प्रवास, रसिकांचं प्रेम आणि त्यातच पंकज त्रिपाठींसारख्या कसलेल्या अभिनेत्याची कौतुकाची थाप — रौप्यमहोत्सवाच्या टप्प्यावर मिळालेली ही शाबासकी ‘एक तिची गोष्ट’च्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा क्षण ठरली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page