मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. कोकणातील ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. ‘वस्त्रहरण’, ‘दोघी’, ‘वनरुम किचन’ यांसारख्या लोकप्रिय नाटकांमधून महाराष्ट्राचं अप्रतिम मनोरंजन करणाऱ्या या दिग्गज कलाकारांनी दहिसरमधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयोमानानुसार आलेल्या आजाराशी त्यांची झुंज अखेर फोल ठरली.
‘वस्त्रहरण’ हे त्यांचं नाटक मराठी रंगभूमीवर गाजलेल्या क्लासिकपैकी एक ठरलं. मालवणी भाषेचा दर्जा उंचावण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सुप्रसिद्ध विनोदी लेखक पु. ल. देशपांडे यांनी सुद्धा गवाणकर यांच्या प्रतिभेचं कौतुक केलं होतं. त्यांची ‘वनरुम किचन’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’ ही नाटके देखील अफाट लोकप्रिय ठरली आणि त्यांच्या लेखनावर अनेक पुस्तकेही प्रकाशित झाली.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि अखेर सोमवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना आणि नातवंडांचा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दहिसर येथील अंबावाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
1971 साली गवाणकर यांनी रंगभूमीवरील प्रवासाला सुरुवात केली. ‘बॅकस्टेज’ हे त्यांचं पहिलं नाटक. त्याचवेळी त्यांनी एमटीएनएलमध्येही नोकरी केली, पण रंगभूमीवरील प्रेमाने त्यांना पूर्णपणे खेचून घेतलं. गरिबी आणि संघर्षाला कलात्मकतेने रंगमंचावर आणणारी त्यांची शैली प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे.
‘वस्त्रहरण’ या नाटकाचे तब्बल पाच हजारांहून अधिक प्रयोग झाले होते. त्याच नाटकावर आधारित त्यांचं आत्मकथन ‘व्हाया वस्त्रहरण’ हे सुद्धा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं ठरलं. त्यांच्या जाण्यानं मराठी साहित्य आणि रंगभूमीने एक अनमोल रत्न गमावलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
