Daya Dongre: ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
दया डोंगरे या रुपेरी पडद्यावरच्या ‘खाष्ट सासू’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या. त्यांनी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या. विशेषतः ‘चार दिवस सासूचे’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘उंबरठा’, ‘मायबाप’, ‘कुलदीपक’ आणि ‘स्वामी’ या मालिकांमधील त्यांचा अभिनय प्रेक्षकांना आवडला. काही हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केलं होतं.
दया डोंगरे या कलावंत घराण्यात जन्मलेल्या होत्या. त्यांच्या आई यमुताई मोडक या देखील ज्येष्ठ अभिनेत्री होत्या, तर शांता मोडक या गायिका आणि अभिनेत्री त्यांच्या आत्या. या दोघींकडूनच त्यांनी कलेचा वारसा जपला. ११ मार्च १९४० रोजी त्यांचा जन्म झाला.
सुरुवातीला त्यांची ओढ संगीताकडे होती. त्यांनी शास्त्रीय आणि नाट्यसंगीताचं प्रशिक्षण घेतलं आणि आकाशवाणी गायनस्पर्धेतही नाव कमावलं. परंतु नंतर त्यांनी अभिनयाकडे वळून एक वेगळी ओळख निर्माण केली.
अभिनेत्री ललिता पवार यांच्यानंतर ‘खाष्ट सासू’च्या भूमिकेत दया डोंगरे यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या अभिनयाची प्रेक्षकांनी मनापासून दखल घेतली.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. संपूर्ण मराठी सिनेसृष्टी त्यांच्या जाण्याने शोकमग्न झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
