Vidyadhar Joshi: दादरच्या कबुतरखान्याच्या वादावरून काही महिन्यांपूर्वी मोठं राजकारण पेटलं होतं. सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्ट दोघांनीही कबुतरखान्यांवर बंदी घातली होती. या प्रकरणावर अनेकांनी मतप्रदर्शन केलं आणि आता प्रसिद्ध अभिनेते विद्याधर जोशी यांनीही स्पष्ट भूमिका मांडली आहे.
अमोल परचुरे यांच्या ‘कॅचअप मराठी’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत विद्याधर जोशींनी कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर थेट भाष्य केलं. ते म्हणाले, “कबुतरखाने, कबुतर किंवा त्यांच्या विष्ठेमुळे फुफ्फुसाचे गंभीर आजार होऊ शकतात. सगळ्यांनाच माझ्यासारखा त्रास होईल असं नाही, पण मुंबईत राहणाऱ्यांचं फुफ्फुस काही प्रमाणात विकृत झालेलं आहे, हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे.”
त्यांनी पुढे सांगितलं, “मला समजत नाही, जेव्हा सगळ्यांना माहिती आहे की यामुळे संपूर्ण समाजाला त्रास होतोय, तरी काही लोक त्याला पाठिंबा कसा देतात? याचा कोणत्याही धर्म, जात किंवा पंथाशी काही संबंध नाही. हे सगळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.”
विद्याधर जोशी यांनी राजकारण्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत म्हटलं, “ते खासदार… डोक्यावर पडली आहेत का ही माणसं? मोठमोठे डॉक्टर सांगतायत, पण ऐकून घेत नाहीत. तुम्ही समाजाचं नुकसान करत आहात. आधीच प्रदूषण आणि आजारांचं प्रमाण वाढलंय, त्यात आणखी हे सर्व वाढवणं योग्य नाही.”
त्यांनी पुढे सांगितलं की, शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे आणि त्यामुळे नॅशनल पार्कसारख्या ठिकाणांनाही धोका निर्माण होऊ शकतो. “पूर्वी आमचा आरसीएफ कारखाना शहराबाहेर होता, पण आता शहरच तिथं पोहोचलं आहे. तसंच विकासाच्या वेगामुळे पर्यावरणाचं नुकसान होतंय,” असंही ते म्हणाले.
विद्याधर जोशींच्या या स्पष्ट आणि प्रामाणिक विधानावर सोशल मीडियावर चर्चेचा विषय रंगला आहे. अनेकांनी त्यांच्या धाडसी मताचं कौतुक केलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
