दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. हा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ चित्रपटाचा दुसरा भाग आहे. प्रदर्शना नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा सिनेमा पाहिला आणि फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहून आपलं मत व्यक्त केलं.
राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर थेट भाष्य केलं आहे. त्यांनी लिहिलं, “आज विकास म्हणजे मोठे रस्ते, पूल आणि चमकदार घोषणा इतकाच झाला आहे. पण या सगळ्यात सत्ताधाऱ्यांचाच विकास दिसतो, जनतेचा नाही. धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की शेतकरी असो किंवा मराठी माणूस – सगळे त्यांच्या हातातील खेळणं बनतात.”
ते पुढे म्हणाले, “या राज्यातील शेतकरी अत्यंत हतबल आहे. एका बाजूला पावसाचा तडाखा, तर दुसऱ्या बाजूला सरकारी दुर्लक्ष. ज्यांच्या मुलांच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, तोच शेतकरी आज आत्महत्या करतो, हे भीषण वास्तव आहे.”
राज ठाकरे यांनी मराठी माणसांच्या प्रश्नांवरही रोख ठेऊन लिहिलं, “ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जमीन विकायला भाग पाडलं जातं, तर शहरांमध्ये मराठी लोकांना घरं मिळत नाहीत. त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय दिलं जातं, आणि त्यांच्या जगण्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
शेवटी त्यांनी जनतेला आवाहन केलं – “हे सगळं आपल्याला दिसतंय, पण जोपर्यंत मनात राग आणि आग निर्माण होत नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा फक्त सिनेमा नाही, ही महाराष्ट्राच्या मनातील अस्वस्थता आहे. हा चित्रपट नक्की पहा.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
