‘सोहळा’ची कथा एका गावात राहणाऱ्या लहान मुलाभोवती आणि त्याच्या कुटुंबाभोवती फिरते. मुलाच्या नजरेतून कुटुंब, मैत्री आणि आजूबाजूचं जग समजून घेण्याचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. ग्रामीण वातावरणातील साधेपणा आणि माणसांमधील आपुलकीही ट्रेलरमध्ये दिसते.
मराठीत ‘सोहळा’ म्हणजे उत्सव. महाराष्ट्रातील कुटुंब आणि समाजात साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक वयात येण्याच्या सोहळ्याच्या संकल्पनेशी चित्रपटाचं नाव जोडलेलं आहे. त्यामुळे ‘सोहळा’ हे नाव केवळ शीर्षक न राहता चित्रपटाच्या कथेशीही संबंधित आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना सोनाली बेंद्रेने सांगितलं की, ती ‘सोहळा’शी पहिल्यापासूनच जोडली गेली. चित्रपटातील साधं आणि ओळखीचं जग तसेच लहान-लहान प्रसंग तिला भावले. प्रेक्षकांनाही ट्रेलर पाहताना आपल्या आयुष्यातील एखादा प्रसंग किंवा आठवण यात सापडेल, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.
सोनाली बेंद्रे पहिल्यांदाच मराठी चित्रपटाच्या प्रेझेंटरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे ‘सोहळा’च्या निमित्ताने तिचं मराठी सिनेसृष्टीशी जोडले जाणं विशेष ठरत आहे.
चित्रपटात प्रवीण डाळिंबकर, देवदत्त प्रशांत गोणे, वर्षा मालवडकर, वैष्णवी संजय घोडके आणि अलेस्सांड्रा व्हेलन मेरेडिझ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन सैकत बागबान यांनी केलं आहे.
गोल्डी बहल आणि ‘कॅरीऑन फिल्म्स’च्या बॅनरखाली सचिन श्रीवास्तव, रत्ना श्रीवास्तव आणि कविता बागबान यांनी ‘सोहळा’ची निर्मिती केली आहे. चित्रपट 16 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ट्रेलरनंतर आता या हळुवार कौटुंबिक कथेची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
