5 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजून 2 मिनिटांनी फिल्म सिटीमधील तात्पुरत्या शूटिंग सेटवर आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. हा सेट रिलायन्स मीडिया वर्क्स आणि प्राईम फोकस स्टुडिओच्या मागील बाजूस होता.
मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, सुमारे 100 बाय 20 फूट आकाराच्या तात्पुरत्या सेटवरील PCR युनिटमध्ये आग लागली होती. आगीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावरही समोर आले आहेत. त्यामध्ये सेटमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला दिसत आहेत.
आग इलेक्ट्रिकल वायरिंग, केबल्स आणि इन्स्टॉलेशनपर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती आहे. याशिवाय दरवाजे, लाकडी फळ्या, एसी युनिट्स, बांबू, प्लास्टिकचं साहित्य, साऊंड सिस्टीम आणि शूटिंग उपकरणांचंही नुकसान झालं.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बीएमसी वॉर्ड कंट्रोल आणि 108 रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आग नियंत्रणात आणली. दुपारी 4 वाजून 55 मिनिटांपर्यंत आग पूर्णपणे विझवण्यात आली.
या आगीचा परिणाम केवळ ‘रामायण’च्या सेटपुरता मर्यादित नसल्याचंही समोर आलं आहे. जवळच्या स्टुडिओमध्ये एमटीव्हीच्या ‘हसल 5’ आणि ‘पती, पत्नी और पंगा 2’ या कार्यक्रमांचं शूटिंग सुरू होतं. प्राथमिक माहितीनुसार, आग प्रथम ‘पती, पत्नी और पंगा 2’च्या सेटवर लागली आणि त्यानंतर ‘हसल 5’च्या सेटपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या सेटचं नेमकं किती नुकसान झालं, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
घटनेनंतरचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. या व्हिडीओमध्ये सेटमधून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसत आहे. त्यामुळे सेटच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘रामायण’ हा नितेश तिवारी दिग्दर्शित चित्रपट आहे. भव्य सेट आणि मोठ्या निर्मितीमुळे हा चित्रपट आधीपासूनच चर्चेत आहे. आता सेटवर लागलेल्या आगीच्या घटनेमुळे ‘रामायण’ पुन्हा चर्चेत आलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
