स्मिता तांबेचा नवा सिनेमा ‘धडपड’; शेतकरी कुटुंबाच्या संघर्षाची कथा मोठ्या पडद्यावर

Dhadpad Marathi Movie: मराठी सिनेसृष्टीत वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटांची संख्या वाढत आहे. याच वाटेवर आता ‘धडपड’ हा नवा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ग्रामीण जीवन, शेतकरी कुटुंबाचा संघर्ष, नात्यांमधील ताणतणाव आणि गावच्या राजकारणाचं वास्तव या चित्रपटातून मांडलं जाणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे सुरुवात झाली आहे.

स्त्रीप्रधान विषय असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. कुटुंब, शेती आणि संकटांशी सामना करत संसार पुढे नेणाऱ्या एका स्त्रीची गोष्ट ‘धडपड’मधून पाहायला मिळणार आहे.

बोधी सिनेमा प्रस्तुत आणि अश्विनी समाधान ऐवळे निर्मित या चित्रपटाची कथा बालाजी वाघमोडे यांनी लिहिली आहे. ‘फुला’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक जावीर ‘धडपड’चं दिग्दर्शन करत आहेत.

चित्रपटाच्या तांत्रिक टीममध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून अनुप जगदाळे, कॅमेरामन म्हणून वीरधवल पाटील, कला दिग्दर्शक अतुल लोखंडे, वेशभूषा दीपाली देशमुख आणि नेपथ्याची जबाबदारी स्वाती थोरात यांच्याकडे आहे. कल्पेश जगताप कार्यकारी निर्माता असून समाधान ऐवळे संगीत दिग्दर्शन करत आहेत.

‘धडपड’मध्ये स्मिता तांबे यांच्यासोबत किशोर चौगुले, कुशल बद्रिके, पार्थ भालेराव, मोनालिसा बागल, अश्विनी कासार, प्रभाकर मोरे आणि रोहित चव्हाण हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

या चित्रपटाची कथा एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाभोवती फिरते. कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या चुकीच्या निर्णयांचा परिणाम संपूर्ण घरावर होतो. त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणींशी सामना करत एक स्त्री आपल्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करते.

शेती, घर आणि मुलांच्या भवितव्यासाठी मेहनत करणाऱ्या या स्त्रीचा संघर्ष चित्रपटाचा केंद्रबिंदू असणार आहे. मात्र, कथा केवळ कौटुंबिक प्रश्नांपुरती मर्यादित नाही. गावातील राजकारण, महिला नेतृत्व, राजकीय कुरघोड्या आणि त्याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणामही चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

ग्रामीण मातीशी जोडलेली कथा आणि त्यातील माणसांचे प्रश्न यामुळे ‘धडपड’ वेगळा विषय घेऊन येत आहे. नात्यांची गुंतागुंत आणि राजकारणाचं वास्तव यासोबतच स्वप्नांसाठी सुरू असलेली धडपड या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक अभिषेक जावीर यांच्या मते, ग्रामीण जीवनातील वास्तव आणि माणसांच्या भावनिक संघर्षाला पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येत आहे. त्यामुळे ‘धडपड’कडे मराठी चित्रपटसृष्टीतील आगामी महत्त्वाच्या सिनेमांपैकी एक म्हणून पाहिलं जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page