Chikizing Marathi Movie: बालपण, स्वप्नं आणि जिद्दीची गोष्ट; पहिलं पोस्टर प्रदर्शित

Chikizing Marathi Movie: बालपण म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं. एखादा रंगीत दगड खजिना वाटतो, काठी जादूची कांडी होते आणि बंद दरवाजाच्या पलीकडचं जग एखादं मोठं स्वप्न बनतं. याच निरागस बालविश्वाची आणि स्वप्नांची गोष्ट सांगणाऱ्या आगामी मराठी चित्रपट ‘चिकिझिंग’चं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

त्यासोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली आहे. ‘चिकिझिंग’ यंदाच्या दिवाळीत 12 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दिपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत ‘चिकिझिंग’ची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे. सुप्रिया बागते या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. शब्बीर साबुवाला, रचना वोरा, ऋषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण आणि उन्मेश कुलकर्णी सहनिर्माते आहेत.

राजेंद्र बागते आणि वैभव कुलकर्णी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हिलस्टेशनच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा घडते. गरिबीच्या परिस्थितीत वाढणाऱ्या चिक्या नावाच्या चुणचुणीत आणि खोडकर मुलाची ही गोष्ट आहे.

चिक्या दर शनिवारी आपल्या आईसोबत एका श्रीमंत निवासी शाळेत जातो. या शाळेचं भव्य जग त्याला आकर्षित करतं. शाळेचं मोठं लोखंडी गेट आणि त्याच्या आतलं वेगळं विश्व त्याच्यासाठी एका स्वप्नासारखं आहे.

या स्वप्नाचा तो गुपचूप पाठलाग करत राहतो. त्याची गुपितं ऐकून घेणारा एकमेव मित्र आहे स्ट्रॉबेरीच्या शेतातलं बुजगावणं. त्याच्याशी गप्पा मारणं, तायडीसोबत लाकूडफाटा गोळा करणं, दिवाळीत इतर मुलांना फटाके फोडताना लांबून पाहणं आणि वेगवेगळ्या वस्तू आपल्या शाळेच्या दप्तरात जपून ठेवणं, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून चिक्याचं विश्व उलगडत जातं.

पण चिक्या हे सगळं का करतो? त्याच्या मनात नेमकं काय सुरू आहे? त्याच्या या कृतीमागे केवळ बालपणीची निरागसता आहे की त्यामागे एखादं मोठं स्वप्न दडलं आहे? हे प्रश्न चित्रपटाची उत्सुकता वाढवतात.

‘चिकिझिंग’ केवळ मुलांसाठीचा चित्रपट नाही. बालपण, स्वप्नं, कुटुंब आणि आशावाद यांचा अनुभव मुलांसोबत पालकांनाही घेता यावा, अशा पद्धतीने हा चित्रपट मांडण्यात आला आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात मुलांच्या कल्पनाशक्तीकडे आणि त्यांच्या छोट्या छोट्या स्वप्नांकडे पुन्हा एकदा पाहण्याची संधी या चित्रपटातून मिळणार आहे.

या चित्रपटात प्रभाकर मोरे, कृष्णराज वाईंगडे, सेजल कोरे, अमृता सुरेश आणि डॉ. सोनाली घाटणेकर यांच्यासह इतर कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मुलांच्या विश्वातील ही हळुवार गोष्ट 12 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. एका छोट्या मुलाचं मोठं स्वप्न आणि त्या स्वप्नामागचा प्रवास नेमका काय आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समोर येईल.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page