‘ईठा’ हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारत आहे. दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.
चित्रपटाची आधीची रिलीज डेट 28 ऑगस्ट होती. त्याच काळात यशचा ‘टॉक्सिक’ चित्रपटही प्रदर्शित होणार होता. त्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर होण्याची शक्यता होती. ‘ईठा’ची रिलीज पुढे ढकलण्यात आल्याने ही स्पर्धा आता टळली आहे.
मॅडॉक फिल्म्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘ईठा’च्या नव्या तारखेची माहिती दिली. त्यामुळे श्रद्धा कपूरच्या चाहत्यांना चित्रपटासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.
मात्र, यशसोबतचा क्लॅश टळला असला तरी 4 डिसेंबरच्या तारखेमुळे चित्रपटासमोर वेगळं आव्हान उभं राहू शकतं. या काळात प्रभासचा ‘फौजी 3’ आणि अक्षय कुमारचा आगामी चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा पाहायला मिळू शकते. मात्र, सध्या या चित्रपटांच्या तारखांमध्ये पुढे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, ‘ईठा’चा टीझर जूनमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात श्रद्धा कपूर विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत दिसली. एका प्रसंगात विठाबाई प्रसूतीनंतर पुन्हा रंगमंचावर परफॉर्म करण्यासाठी सज्ज होताना दाखवण्यात आल्या आहेत. या टीझरमधून त्यांच्या संघर्षाची आणि कलेप्रती असलेल्या समर्पणाची झलक पाहायला मिळाली.
टीझर समोर आल्यानंतर श्रद्धा कपूरच्या लूक आणि अभिनयाचीही चर्चा झाली. चित्रपटात तिच्यासोबत रंदीप हुड्डा आणि मोहम्मद झीशान अय्यूब यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी यापूर्वी ‘छावा’सारखा यशस्वी चित्रपट दिला आहे. त्यामुळे त्यांच्या ‘ईठा’कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका किती प्रभावीपणे साकारते आणि नव्या रिलीज डेटचा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर किती फायदा होतो, याकडे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
