एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचा ‘प्रेमाची गोष्ट २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आधीच टिझर आणि गाणी चर्चेत असताना, नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
ट्रेलर लाँच कार्यक्रमात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांनी ‘ओल्या सांजवेळी २.०’ आणि ‘ये ना पुन्हा’ या गाण्यांवर नृत्य सादर करत रंगत आणली. ट्रेलरमध्ये ललितच्या आयुष्यातील वळणं — लग्न, घटस्फोट आणि जुनं प्रेम पुन्हा समोर येणं — या सगळ्याची झलक दिसते. आयुष्याच्या गोंधळात देवाकडे तो उत्तर शोधताना दिसतो, पण देव त्याला खरंच दुसरी संधी देईल का, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपट पाहावा लागणार आहे.
‘प्रेमाची गोष्ट २’ आधुनिक काळातील प्रेम आणि नात्यांचा आरसा दाखवणारा चित्रपट आहे. डिजिटल जगात बदलणाऱ्या भावना, नात्यांचं रूप आणि व्हीएफएक्सचा नवा वापर या सगळ्याचं सुंदर मिश्रण ट्रेलरमध्ये दिसतं.
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, “ही आजच्या काळाशी सुसंगत अशी फ्रेश प्रेमकहाणी आहे. व्हीएफएक्सचा वापर केवळ सौंदर्यासाठी नाही, तर कथा सांगण्याचा एक वेगळा मार्ग म्हणून केला आहे. हा चित्रपट जेन झी आणि त्यांच्या पालकांना एकत्र जोडणारा आहे.”
निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “सतीशसोबत हा आमचा चौथा प्रकल्प आहे. आम्ही नेहमीच वेगळ्या आणि मनाला भिडणाऱ्या कथा प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही त्याच परंपरेतील आणखी एक खास प्रेमकथा आहे.”
या चित्रपटात ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २१ ऑक्टोबर, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेम आणि नशिबाच्या जादुई प्रवासावर घेऊन जाणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
