औद्योगिक क्रांतीनंतर रोजगारासाठी होणारं स्थलांतर भारतीय जीवनाचा एक भाग बनलं. कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांमधून लोक मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे आले. आज शहरात स्थिरावलेल्या अनेक कुटुंबांची मुळं मात्र अजूनही त्यांच्या गावात आहेत.
शहरात वाढलेल्या नव्या पिढीला गावाबद्दल प्रेम आहे. पण रोजीरोटीची धावपळ आणि वाढती स्पर्धा यामुळे प्रत्येक वेळी गावाकडे जाणं शक्य होत नाही. गाव आणि शहर यांच्यामधली हीच मानसिक ओढ ‘गमन’मध्ये मांडण्यात आली आहे.
‘गमन’ म्हणजे प्रवास. हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नसून रोजीरोटीसाठी शहरात आलेल्या प्रत्येक चाकरमान्याचा प्रवास आहे. दिग्दर्शक मनोज नाईक साटम यांनी कोकणातील जुन्या आणि नव्या पिढीच्या मनात सुरू असलेलं गाव आणि शहराचं द्वंद्व संयमाने मांडलं आहे.
चित्रपटाची कथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धारगावचे भाऊ मालवणकर यांच्याभोवती फिरते. नारायण जाधव यांनी भाऊंची भूमिका साकारली आहे. तब्येतीच्या कारणामुळे ते शहरात मुलाकडे राहायला आले आहेत. डॉक्टरांनी तब्येत ठीक असल्याचं सांगितल्यानंतर मात्र त्यांना पुन्हा गावाची ओढ लागते.
गणपतीचा सण जवळ आला आहे. गावात गणपतीच्या तयारीसाठी जाण्याची भाऊ आणि त्यांची पत्नी माई यांची इच्छा आहे. मात्र वय आणि तब्येतीमुळे गावातील तयारी कशी होणार, हा प्रश्नही त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाकडे काम करणाऱ्या कुंदनला आणि त्याच्या बहिणीला त्यांच्या मदतीसाठी गावी पाठवलं जातं.
याच कथेतून दिग्दर्शकांनी स्थलांतराची आणखी एक बाजू मांडली आहे. निसर्गाच्या आपत्तीमुळे आपली जमीन आणि गाव सोडावं लागलेल्या कुंदनची कहाणी भाऊ आणि माईच्या कथेशी जोडली जाते. त्यातून माणुसकीची उब आणि आपुलकीचा धागा समोर येतो.
गणपतीसाठी मुलं, सुना आणि नातवंडं काही दिवस गावात येतात. सण संपला की पुन्हा घरं रिकामी होतात. एकेकाळी गजबजलेल्या घरांवर पुन्हा कुलूप लागतं. मुलांच्या पुढच्या भेटीची वाट पाहणारे आई-वडील आणि त्यांच्या मनातील हुरहूर चित्रपटात हळुवारपणे दाखवली आहे.
गावाची ओढ आणि कुटुंबाची तगमग हा ‘गमन’चा महत्त्वाचा भाग आहे. माईच्या मनात ‘कोणी कुणाला आयुष्यभर पुरत नाही’ हा विचार आहे. तर भाऊंना काहीही झालं तरी आपली माती विसरायची नाही, असं वाटतं. या दोन विचारांमधून कुटुंबातील नात्यांचा वेगळा पैलू समोर येतो.
नारायण जाधव यांनी गावाकडे परतण्याची इच्छा असलेल्या आणि मुलांची गावाशी असलेली नाळ कमी होत असल्याने अस्वस्थ झालेल्या वडिलांची भूमिका चांगली साकारली आहे. श्रद्धा खानोलकर यांची माईही लक्षात राहते. मुलं आणि वडील यांच्यात समतोल साधणारी त्यांची व्यक्तिरेखा चित्रपटाला भावनिक आधार देते.
मात्र एक गोष्ट खटकते. आई-वडिलांची भाषा कोकणातली असताना शहरात राहणाऱ्या मुलांच्या तोंडी कोकणी भाषेचा फारसा वापर दिसत नाही. जवळपास सगळेच प्रमाण मराठीत बोलताना दिसतात. त्यामुळे कथानकाच्या पार्श्वभूमीशी हा भाग काहीसा विसंगत वाटतो.
बाकी कलाकारांनी आपापल्या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत. कोकण, गाव, गणपती आणि कुटुंबाच्या आठवणींशी जोडलेला हा चित्रपट विशेषतः रोजीरोटीसाठी शहरात आलेल्या आणि मनात गावाची ओढ जपून ठेवलेल्या चाकरमान्यांना आपलासा वाटू शकतो.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
