रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनानंतर एका महिन्यानंतरही चित्रपटाची कमाई सुरू असली, तरी गेल्या काही दिवसांत ‘देऊळ बंद 2’ने बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे.
बॉक्स ऑफिस आकडेवारीनुसार, ‘राजा शिवाजी’ने पहिल्या आठवड्यात 52.65 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 24.30 कोटी रुपये आणि तिसऱ्या आठवड्यात सुमारे 12 कोटी रुपयांची कमाई केली. चौथ्या आठवड्यात चित्रपटाने 4.80 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
29 व्या दिवशी चित्रपटाने 32 लाख रुपये, 30 व्या दिवशी 58 लाख रुपये आणि 31 व्या दिवशी 68 लाख रुपयांची कमाई केली. यासह चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 95.17 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
दुसरीकडे, प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरत आहे. अवघ्या दहा दिवसांत या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत सहावं स्थान मिळवलं आहे.
रविवारी चित्रपटाने तब्बल 5 कोटी रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे, मागील दिवसाच्या तुलनेत कमाईत सुमारे 61 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे रविवारीच्या कमाईच्या बाबतीत ‘देऊळ बंद 2’ने ‘राजा शिवाजी’ला मागे टाकलं आहे.
आतापर्यंत या चित्रपटाने 50 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. आयपीएलचा अंतिम सामना असतानाही मोठ्या संख्येने प्रेक्षक थिएटरमध्ये पोहोचल्याने चित्रपटाच्या कमाईला चांगली चालना मिळाली.
सध्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी ‘देऊळ बंद 2’चा वाढता वेग आणि ‘राजा शिवाजी’ची स्थिर कामगिरी यामुळे मराठी बॉक्स ऑफिसवर रंगतदार स्पर्धा पाहायला मिळत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
