व्ही.आर.के. फिल्मसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती नीलांबरी विक्रांत यांनी केली आहे. जीवन राजेंद्र चव्हाण यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. ओंकार राऊत, गणेश यादव, पंकज विष्णू, सुनील गोडबोले, शिवानी बने, सायली पाचपुते आणि गौरवी महांगडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
‘संडे १९९६’च्या पोस्टरचं अनावरण मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं. पोस्टरमधून चित्रपटाच्या गूढ वातावरणाची झलक पाहायला मिळते. त्यामुळे या कथेत नेमकं रहस्य काय आहे, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
निर्मात्या नीलांबरी विक्रांत यांच्या मते, हा चित्रपट केवळ एक रहस्यकथा नाही. भूतकाळाची वर्तमानाशी असलेली नाळ आणि नात्यांमधील गुंतागुंत यांचा वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे.
दिग्दर्शक जीवन चव्हाण यांच्यासाठी कथेतलं गूढ शेवटपर्यंत टिकवतानाच त्यामागच्या भावनांनाही योग्य न्याय देणं हे मोठं आव्हान होतं. प्रेक्षकांनी केवळ कथा पाहू नये, तर त्यातील प्रसंग आणि भावना अनुभवाव्यात, असा प्रयत्न चित्रपटाच्या टीमने केला आहे.
या चित्रपटाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे कोकणाची निसर्गरम्य पार्श्वभूमी. कोकणातील हिरवाई, समुद्र आणि शांत वातावरणाचा कथेसाठी प्रभावी वापर करण्यात आला आहे. वरकरणी सुंदर आणि निवांत वाटणारं हे वातावरण कथेतल्या गूढतेला आणखी गडद करतं.
काळाचं चक्र अनपेक्षितपणे उलट दिशेने फिरलं, तर त्याचा वर्तमानातील आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो, हा या चित्रपटाचा मध्यवर्ती विचार आहे. त्यामुळे रहस्यासोबत नाती आणि भावनिक संघर्ष यांचाही अनुभव ‘संडे १९९६’मधून पाहायला मिळणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
