Bol Bol Rani Trailer Out: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुप्रतीक्षित ‘बोल बोल राणी’ या रहस्यपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सस्पेन्स, खून, अपहरण आणि सतत समोर येणाऱ्या नव्या रहस्यांमुळे हा ट्रेलर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रत्येक प्रसंगानंतर कथेत नवा ट्विस्ट पाहायला मिळत असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
ट्रेलरमध्ये सई ताम्हणकर एका वेगळ्याच भूमिकेत दिसत आहे. संपूर्ण कथा तिच्या पात्राभोवती फिरत असल्याचे दिसून येते. तिच्यासोबत घडणाऱ्या घटनांमागचे सत्य काय आहे, ती या प्रकरणातील बळी आहे की संपूर्ण खेळाची सूत्रधार, याचा उलगडा चित्रपटात होणार आहे.
चित्रपटात सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये प्रत्येक पात्र काहीतरी लपवत असल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोण संशयाच्या भोवऱ्यात आहे, हे शेवटपर्यंत स्पष्ट होत नाही.
चित्रपटाचे दिग्दर्शक सिड विंचुरकर यांनी सांगितले की, ट्रेलरमधून केवळ कथेची झलक दाखवण्यात आली आहे. प्रत्येक पात्राचे एक गुपित आहे आणि प्रत्येक वळण प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देईल. तसेच सई ताम्हणकरची भूमिका तिच्या कारकिर्दीतील सर्वांत वेगळ्या भूमिकांपैकी एक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड’ निर्मित या चित्रपटाचे निर्माते अपूर्वा मोतिविले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली आहेत. यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.
‘बोल बोल राणी’ हा रहस्य आणि थराराने भरलेला चित्रपट १७ जुलै रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादानंतर या चित्रपटाची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
