हा चित्रपट 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. नैसर्गिक आपत्तीवर आधारित मराठीतील पहिल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘एक होतं माळीण’मध्ये त्या भीषण दुर्घटनेमागची वेदना आणि वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ट्रेलरमध्ये मुसळधार पावसामुळे एका रात्रीत संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाल्याचं आणि अनेक कुटुंबांचं आयुष्य कसं बदललं, याची झलक पाहायला मिळते. या दुर्घटनेची तीव्रता आणि त्यामागील मानवी वेदना प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे.
चित्रपटाची कथा पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे. दिग्दर्शक राजू राणे आणि दत्तात्रय गायकर यांनी माळीण गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांच्या अनुभवांच्या आधारे कथानक तयार केल्याचं सांगितलं आहे.
या चित्रपटाची निर्मिती संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी केली असून, रुपेश राणे, अरुण कोंजे, दत्तात्रय गायकर आणि राजू राणे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखनातही राजू राणे आणि दत्तात्रय गायकर यांचा सहभाग आहे.
चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक आणि अनुज ठाकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी आणि हरिदास शिंदे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे.
‘एक होतं माळीण’ हा केवळ एका नैसर्गिक आपत्तीचा प्रवास दाखवत नाही, तर त्यातून उभ्या राहिलेल्या नातेसंबंध, संघर्ष, प्रेम आणि मानवी भावनांचाही वेध घेतो. ट्रेलरमधील दृश्ये या घटनेची तीव्रता जाणवून देतात आणि चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
