नाना पाटेकर यांनी आपल्या कारकिर्दीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. “मला आता निवृत्ती हवी आहे. मी नाटक, सिनेमातून ९९ टक्के निवृत्त होत आहे,” अशा भावूक शब्दांत त्यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतून जवळपास संन्यास घेतल्याची घोषणा केली. पुण्यात झालेल्या ‘नाम फाउंडेशन’च्या दशकपूर्ती सोहळ्यात त्यांनी हे वक्तव्य केलं.
आपल्या भावना व्यक्त करताना नाना म्हणाले, “मी १ जानेवारीला पंचाहत्तरी पूर्ण करणार आहे. आता मला माझ्या मनासारखं जगायचं आहे, लोकांच्या समस्या समजून घ्यायच्या आहेत. गावखेड्यांमध्ये राहून लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. त्यामुळे सिनेमातून आणि नाटकातून मी जवळपास पूर्णपणे निवृत्त होतोय.”
कार्यक्रमात त्यांनी ‘नाम फाउंडेशन’चं पुढचं नेतृत्व मकरंद अनासपुरे यांच्याकडे सोपवलं. “मकरंद, तू आता नामच्या कामात लक्ष दे. मी बाजूला होतोय, पण पाठीवर थाप द्यायला कायमसोबत असेन,” असं ते म्हणाले.
नाना पाटेकर यांनी पुढे सांगितलं की, संस्थेच्या कामासाठी व्यक्तीपेक्षा विचार महत्त्वाचा असतो. “‘नाम’सारख्या शंभर संस्था निर्माण झाल्या तरी समाजातील सगळ्या समस्या सुटणार नाहीत, पण त्यांच्यावर काम करणं गरजेचं आहे,” असं त्यांनी अधोरेखित केलं.
या घोषणेनंतर नाना पाटेकरांच्या चाहत्यांमध्ये भावूकता आणि आदराचं वातावरण आहे. कलाक्षेत्रातील भव्य योगदानानंतर त्यांनी समाजासाठी काम करण्याचा निर्धार केल्याने ही त्यांच्या आयुष्यातील नवीन सुरुवात ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
