Priyadarshini Indalkar: ‘दशावतार’ सिनेमातून आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यात घडलेला भीषण अपघात उघड केला, जो ऐकून चाहत्यांनाही धक्का बसला.
प्रियदर्शिनीने ‘MHJ Unplugged’ या पॉडकास्टमध्ये तिच्या अपघाताविषयी सांगितलं. ती म्हणाली, “मी नववीत होते. माझ्या हातावरची खूण पाहून अनेकजण विचारतात — ही कशी पडली? तर ही त्या अपघाताची खूण आहे. मी आणि आई पुण्याहून साताऱ्याकडे जात होतो. मध्ये वाळूंज या ठिकाणी आमची गाडी १५०च्या स्पीडने डिव्हायडरला धडकली. मला काही समजलंच नाही — कदाचित आईला झोप लागली असावी किंवा टायर फुटला असेल.”
ती पुढे म्हणाली, “मी मागच्या सीटवर आडवी झोपले होते. धडकेत मी खाली पडले आणि गाडीचा बम्प माझ्या पोटात लागला. आतून रक्तस्त्राव झाला, स्प्लीन कट झाली आणि डाव्या हाताला फ्रॅक्चर झालं. बाहेरून मात्र सगळं ठीक दिसत होतं. आईची अवस्था फारच वाईट होती, त्यामुळे सगळं लक्ष तिच्याकडे गेलं.”
त्या वेळी प्रियदर्शिनी अर्धवट शुद्धीत होती. ती म्हणाली, “डोळे उघडत नव्हते, पण लोकांच्या आवाज ऐकू येत होते. मी फक्त म्हणाले, ‘माझ्या आईला वाचवा’. त्यांनी माझ्याकडून घरचा नंबर विचारला आणि तो मी सांगितला. तो फोन आजी-आजोबांनी उचलला आणि घरात खळबळ माजली. बाबा त्यावेळी चेन्नईत होते, त्यांनी पहिली फ्लाईट पकडली.”
प्रियदर्शिनी पुढे म्हणाली, “मला फक्त पोटात दुखतंय असं वाटत होतं. डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितली आणि तेव्हाच समजलं की माझं HBS खूप कमी झालं आहे. ते वेळेवर समजलं नसतं तर मी तशीच झोपेतच संपले असते. डॉक्टरांनी योग्य वेळी उपचार केले, म्हणूनच मी आज जिवंत आहे.”
तिने शेवटी डॉक्टर आणि आईवडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सांगितलं की, “आज जे काही आहे ते त्यांच्या मुळेच.” तिच्या या भावनिक खुलाशाने चाहत्यांचं मन भारावून गेलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
