Mahesh Manjrekar: ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले‘ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून, सध्या प्रेक्षकांमध्ये त्याची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे. ‘दृश्यम 2’ आणि ‘देवमाणूस’मधील अभिनयानंतर त्याला या भूमिकेत पाहून प्रेक्षक प्रभावित झाले आहेत.
पण दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अलीकडे दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सिद्धार्थला या भूमिकेसाठी घेतल्यावर अनेकांनी विरोध केला होता. त्यांनी म्हटलं, “मी त्याला या सिनेमासाठी निवडलं तेव्हा तो ‘देवमाणूस’मध्ये नव्हता. सिद्धार्थ थिएटर करतो हे माहीत होतं, पण त्याचं पहिलं नाटक ‘अनन्या’ मी पाहिलं नव्हतं. तरीही त्याच्यात एक वेगळी ऊर्जा दिसली आणि मला खात्री वाटली की तो शिवाजी महाराजांची भूमिका करू शकेल.”
मांजरेकर पुढे म्हणाले, “मी त्याला ‘दृश्यम 2’मध्ये पाहिलं आणि त्याच वेळी ठरवलं की, तू माझ्याकडे शिवाजी महाराज करतोयंस. त्याला वजन कमी करावं लागेल, घोडेस्वारी शिकावी लागेल, हेही सांगितलं. त्याने होकार दिला आणि जबरदस्त मेहनत घेतली. बरेच जण म्हणाले की प्रसिद्ध कलाकार घ्या, पण मला वाटलं की सिद्धार्थच योग्य आहे.”
ते पुढे म्हणाले, “त्याने मेहनतीनं ही भूमिका जिवंत केली. सिनेमा पाहिला की कळतं, त्यानं छत्रपतींचं व्यक्तिमत्त्व उत्तम साकारलं आहे.”
चित्रपटातील दुसरा महत्त्वाचा कलाकार विक्रम गायकवाड याबद्दलही मांजरेकर बोलले. त्यांनी सांगितलं, “विक्रम खूप गुणी नट आहे. त्याला घेतल्यावरही लोक म्हणाले की नाही घेऊ नको. पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला. नंतर चॅनेलवाल्यांना सिनेमा दाखवला तेव्हा सगळे म्हणाले, विक्रम गायकवाडनं कमाल केली आहे.”
या चित्रपटात सिद्धार्थ बोडके आणि विक्रम गायकवाड यांच्यासह त्रिशा ठोसर, सयाजी शिंदे, शशांक शेंडे, मंगेश देसाई, भार्गव जगताप आणि पायल जाधव अशी दमदार स्टारकास्ट दिसते आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
