या चित्रपटाच्या पोस्टरचं नुकतंच मंत्रालयात अनावरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते हे अनावरण झालं. यावेळी दोन्ही मान्यवरांनी चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
म्हाळसा एंटरटेन्मेंटच्या डॉ. संजना सुरेश पै आणि अव्यान आर्ट्सच्या अंजली तुषार नान्नजकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. वेदांती दाणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
चित्रपटाची कथा तीन पिढ्यांतील महिलांना जोडणारी आहे. मुलीच्या जन्मापासून तिचं बालपण, तारुण्य आणि लग्नानंतरचं आयुष्य या वेगवेगळ्या टप्प्यांकडे पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आजी, आई आणि सध्याच्या पिढीतील स्त्री अशा विविध अनुभवांमधून या नात्यांचा वेध घेतला जाणार आहे.
अदिती तटकरे यांनी चित्रपटाच्या विषयाचं कौतुक करताना हा सिनेमा केवळ महिलांसाठी मर्यादित राहणार नसल्याचं म्हटलं आहे. नात्यांकडे आणि आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन पुरुष प्रेक्षकांनाही या चित्रपटातून मिळू शकतो, असं त्यांनी सांगितलं.
‘लग्न’ ही आयुष्यातील एक घटना असली तरी त्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. नवीन नाती, वाढणाऱ्या जबाबदाऱ्या, स्वतःच्या इच्छा, करिअर आणि स्वप्नं यांच्यात समतोल साधताना तिला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. स्त्रीची स्वतःची ओळख जपण्याचा हा प्रवास ‘लग्न आणि बरंच काही’मधून संवेदनशीलपणे मांडला जाणार आहे.
या चित्रपटाच्या पडद्यामागील टीममध्येही महिलांचा मोठा सहभाग आहे. संगीत वैशाली सामंत, छायाचित्रण स्मिता निर्मळ, संकलन भक्ती मायाळू, संवाद शर्वरी पेटकर आणि कथा यशश्री मसूरकर यांनी सांभाळली आहे. वेशभूषेची जबाबदारी अपेक्षा गांधी सोनी यांच्याकडे आहे.
याशिवाय मीडिया दिग्दर्शन प्रज्ञा सुमती, डिजिटल मार्केटिंग अश्मिकी टिळेकर आणि पब्लिसिटी डिझाइन प्राजक्ता डोंगरे यांनी काम पाहिलं आहे.
अभिनेत्री पूजा सावंत आणि अक्षया नाईक या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या व्यक्तिरेखांमधून स्त्रीच्या आयुष्यातील नाती, भावना आणि बदलत्या परिस्थिती कशा प्रकारे मांडल्या जातात, याची उत्सुकता आहे.
मंत्रालयात पोस्टरचं अनावरण झाल्यानंतर ‘लग्न आणि बरंच काही’च्या विषयाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. लग्न, नाती, जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या स्वप्नांचा शोध घेणाऱ्या स्त्रीची ही कथा प्रेक्षकांना किती भावते, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
