२६/११ हल्ल्याची कहाणी पुन्हा पडद्यावर; ललित प्रभाकरच्या कसाबच्या भूमिकेने वेधलं लक्ष

Prahaar Movie Trailer – Lalit Prabhakar as Ajmal Kasab: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला आजही देशाच्या स्मरणात आहे. या हल्ल्यात पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्याविरोधात न्यायालयात खटला लढणारे ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची कथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘प्रहार’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सध्या चर्चेत आहे.

या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव यांनी उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकर अजमल कसाबच्या भूमिकेत दिसणार आहे. २६/११ हल्ल्यानंतर कसाबला न्यायालयीन प्रक्रियेतून फाशीची शिक्षा मिळेपर्यंतचा प्रवास चित्रपटात मांडण्यात आला आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच राजकुमार राव कोर्टात एका लहान मुलीला २६/११च्या हल्ल्यादरम्यान नेमकं काय घडलं, याबाबत प्रश्न विचारताना दिसतात. त्यानंतर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची दृश्यं पाहायला मिळतात.

ट्रेलरमध्ये हल्ल्यानंतरचा तपास आणि कसाबविरोधातील कायदेशीर लढाईची झलकही पाहायला मिळते. याचदरम्यान कसाब आपण १७ वर्षांचा असल्याचं सांगतो आणि या दाव्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळत असल्याचं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

ललित प्रभाकरने यापूर्वी विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र, कसाबच्या भूमिकेतील त्याचा लूक आणि अभिनय विशेष लक्ष वेधून घेत आहे. चेहऱ्यावरचं निर्ढावलेपण आणि हल्ल्याच्या दृश्यांमधील त्याचा अभिनय पाहून ट्रेलरमध्ये त्याने हे पात्र प्रभावीपणे साकारल्याचं दिसतं.

दुसरीकडे, राजकुमार राव यांची उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेतील झलकही लक्षवेधी आहे. कोर्टातील प्रसंगांमध्ये त्यांचा गंभीर अंदाज पाहायला मिळतो.

‘प्रहार’मध्ये राजकुमार राव आणि ललित प्रभाकर यांच्यासोबत वामिका गब्बी, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी केलं आहे.

१६ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘प्रहार’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. २६/११सारख्या संवेदनशील घटनेची कथा आणि कलाकारांची भूमिका पाहता, चित्रपटाला प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page