नामदेव ढसाळ हे केवळ कवी नव्हते, तर त्यांच्या लेखणीतून सामाजिक अन्यायाविरुद्धचा आवाज बुलंद झाला. त्यांच्या कविता, बंडखोर विचार आणि संघर्षमय आयुष्याचा वेध या चित्रपटातून घेतला जाणार आहे. टीझरमधील ललित प्रभाकरचा लूक पाहून या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
नामदेव ढसाळांचा संघर्ष पडद्यावर उलगडणार
नामदेव ढसाळ यांनी आपल्या परखड लेखनातून मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली. समाजातील विषमता आणि अन्याय यांच्यावर त्यांनी आपल्या कवितांमधून भाष्य केलं. त्यांच्या साहित्याचा आणि विचारांचा प्रभाव मोठा असल्याने त्यांचा जीवनप्रवास चित्रपटाच्या माध्यमातून मांडणं हे आव्हानात्मक काम आहे.
चित्रपटाच्या दिग्दर्शिका वरुणा मदनलाल राणा यांनी नामदेव ढसाळ यांच्या आयुष्याचा आणि साहित्याचा अनेक वर्षे अभ्यास केल्याचं सांगितलं. त्यांच्या मते, ढसाळ यांचं व्यक्तिमत्त्व समजून घेण्यासाठी केवळ त्यांच्या जीवनातील घटना जाणून घेणं पुरेसं नाही; त्यांच्या विचारांमागची अस्वस्थता, विद्रोह आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकदही समजून घ्यावी लागते.
त्यांचा संघर्ष आणि विचारांची धार पडद्यावर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आल्याचं दिग्दर्शिकेने स्पष्ट केलं. धम्मा फेस्टिव्हलसारख्या व्यासपीठावर टीझर प्रदर्शित झाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
इलैयाराजा यांचं संगीत, मराठी गायकांचा आवाज
‘ढसाळ’ चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी ज्येष्ठ दाक्षिणात्य संगीतकार इलैयाराजा यांनी सांभाळली आहे. गीतलेखन इर्शाद कामील आणि गुरु ठाकूर यांनी केलं आहे. आदर्श शिंदे, दिव्य कुमार, रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड, उर्मिला धनगर आणि विभावरी आपटे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे.
चित्रपटातील संवाद अभय सोडये, प्रताप गंगावणे आणि अश्वजीत कांबळे यांनी लिहिले आहेत. ललित प्रभाकरचा नामदेव ढसाळ यांच्या रूपातील लूक रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी साकारला आहे. कला दिग्दर्शन एकनाथ कदम यांचं असून, छायाचित्रणाची जबाबदारी मिलिंद जोग यांनी सांभाळली आहे.
नामदेव ढसाळ यांच्या शब्दांची ताकद, सामाजिक संघर्ष आणि बंडखोर विचार मोठ्या पडद्यावर कशा प्रकारे मांडले जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर आता चित्रपटाच्या पुढील अपडेट्स आणि प्रदर्शनाच्या तारखेकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
