मराठी चित्रपटांसाठी स्क्रीन राखीव ठेवण्याची गरज; मल्टीप्लेक्समधील शोवरून पुन्हा वाद

मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाइम शो मिळवण्यासाठी आजही संघर्ष करावा लागत असल्याची तक्रार पुन्हा समोर आली आहे. हिंदी, इंग्रजी आणि दाक्षिणात्य बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले की मराठी सिनेमांच्या शोच्या वेळांवर परिणाम होतो, असा आरोप निर्माते आणि कलाकारांकडून केला जात आहे.

महानगरांमधील काही मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना कमी स्क्रीन दिल्या जातात. काही वेळा चित्रपटाला कोणतीही पूर्वसूचना न देता दोन-तीन दिवसांत शो बंद केले जातात. शोच्या वेळा ऐनवेळी बदलणे किंवा रद्द करणे, तसेच आठवड्याचे शुल्क आकारल्यानंतर उर्वरित रक्कम परत न करणे, अशा तक्रारीही समोर येत आहेत.

मराठी चित्रपटांना योग्य संधी मिळावी यासाठी राज्य सरकारने विशेष समिती स्थापन केली आहे. मात्र, तरीही मल्टीप्लेक्समधील शो आणि स्क्रीनसंदर्भातील अडचणी पूर्णपणे सुटलेल्या नाहीत.

गेल्या आठवड्यात ठाण्यात ‘भूतम भयम’ या मराठी चित्रपटाला प्राईम टाइम शो मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. काही ठिकाणी चित्रपट केवळ दोन दिवस दाखवून त्याचे शो बंद करण्यात आल्याचा आरोपही कलाकारांनी केला. याबाबत आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पाठपुरावा झाला आणि त्यानंतर चित्रपटाला काही ठिकाणी प्राईम टाइम शो मिळाले.

दिग्दर्शक रामचंद्र गावकर यांनी या समस्येवर बोलताना ‘भूतम भयम’ला मिळालेल्या शोचे उदाहरण दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटगृहात ‘स्पायडर-मॅन’ प्रदर्शित झाल्यानंतर ‘भूतम भयम’ला सकाळी 8 आणि रात्री 11.30 चे शो देण्यात आले. अशा वेळेत सर्वसामान्य प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी येतील का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यांच्या मते, बिग बजेट चित्रपटांनाही योग्य स्क्रीन आणि शो मिळायला हवेत. मात्र त्याच वेळी मराठी चित्रपटांसाठीही किमान 50 टक्के प्राईम शो राखून ठेवण्याची व्यवस्था असावी. दोन्ही प्रकारच्या चित्रपटांमध्ये समन्वय साधला जाऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनीही मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकवर्गाचा मुद्दा मांडला. आजही मराठी सिनेमाला हिंदी चित्रपटांशी मोठी स्पर्धा करावी लागते. विशेषतः तरुण आणि महानगरांमधील प्रेक्षक हिंदी चित्रपटांना अधिक पसंती देतो, तर मराठी चित्रपटांचा मोठा प्रेक्षक ग्रामीण भागात आहे, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, एकपडदा चित्रपटगृहांची संख्या कमी होत असल्यामुळे मराठी सिनेमांसाठी उपलब्ध पर्यायही कमी झाले आहेत. सरकारने मल्टीप्लेक्स चालकांना वर्षभरात ठरावीक मराठी चित्रपटांचे शो दाखवण्याची अट घातली असली, तरी एखादा चित्रपट मोठा हिट झाला की त्याचे अधिक शो दाखवून ही अट पूर्ण केली जाते, असा दावा भोसले यांनी केला.

त्यामुळे केवळ वर्षभरातील शोची संख्या निश्चित करण्याऐवजी मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र स्क्रीन किंवा किमान ठरावीक प्राईम टाइम स्लॉट राखून ठेवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त होत आहे.

मराठी चित्रपटांना थिएटरमध्ये प्रेक्षक मिळत असताना त्यांना योग्य वेळ आणि पुरेशी स्क्रीन मिळत नसेल, तर त्याचा थेट परिणाम बॉक्स ऑफिस कमाईवर होतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित न राहता मराठी सिनेसृष्टीसमोरील कायमस्वरूपी प्रश्न बनला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page