पोस्टरमध्ये तीन मित्रांचं बेफिकीर आयुष्य पाहायला मिळतं. घरात कपडे, मोबाईल, लॅपटॉप, इअरफोन्स आणि इतर वस्तूंचा अक्षरशः पसारा आहे. या वातावरणात मित्रांची धमाल सुरू आहे. मात्र, या गोंधळाचं कारण काय आहे आणि मांजर त्यात कुठे येतं, याचा खुलासा करण्यात आलेला नाही.
दिग्दर्शक सुशील महादेव यांच्या म्हणण्यानुसार, ‘मांजर’ची कथा तीन मित्रांच्या मोकळ्या आणि बिनधास्त जगाभोवती फिरते. त्यांच्या आयुष्यात मांजर आधीपासूनच आहे. मात्र, त्याच्याभोवती घडणाऱ्या घटनांमुळे त्यांच्या साध्या आयुष्यात एकामागून एक मजेशीर प्रसंग घडू लागतात.
म्हणूनच चित्रपटात केवळ तीन मित्रांची मैत्री पाहायला मिळणार नाही, तर त्यांच्या आयुष्यात निर्माण होणारा गोंधळ आणि त्यातून घडणाऱ्या भन्नाट घटना हा कथेतला महत्त्वाचा भाग असणार आहे. मात्र, ‘मांजर’चं नेमकं रहस्य काय आहे, हे निर्मात्यांनी सध्या गुप्त ठेवलं आहे.
एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राईट फिल्म्स निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पोस्टरमध्ये या कलाकारांची केमिस्ट्री आणि चित्रपटाचा हलका-फुलका अंदाज दिसून येतो.
याशिवाय सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी अंधाडे आणि अश्विनी काळसेकर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
हर्ष, अविनाश शर्मा, हरि राजपूत, बंटी नागी आणि जसबीर नागी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी एए फिल्म्सकडे आहे.
तीन मित्रांच्या आयुष्यात अचानक निर्माण झालेला हा गोंधळ नेमका कशामुळे आहे आणि ‘मांजर’चा कथेशी संबंध काय आहे, हे 18 सप्टेंबर 2026 रोजी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या हटके मराठी कॉमेडीबद्दल प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
