Uttar Movie Teaser: आई आणि मुलाच्या नात्याचं मर्म सांगणाऱ्या ‘उत्तर’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. “आपल्या लेकराचं भलं कशात हे फक्त आईलाच माहीत असतं,” या भावनेवर आधारित ही कहाणी आजच्या काळातील आई-मुलाच्या नात्याला नवी दिशा देणारी ठरेल, असं टिझर पाहून जाणवतं.
झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाद्वारे क्षितिज पटवर्धन दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. रेणुका शहाणे आईच्या भूमिकेत असून, अभिनय बेर्डे तिच्या मुलाची भूमिका साकारत आहे. या दोघांसोबत ऋता दुर्गुळेचीही महत्त्वाची भूमिका आहे.
टीझरमध्ये आई आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलामधला फोनवरील संवाद दाखवला आहे. मुलाच्या “फोन ठेवू का?” या प्रश्नावर आईचं उत्तर — “इनकमिंगला पैसे पडल्यासारखा बोलतोस!” — हा प्रसंग मनाला भिडतो. आजच्या ‘इन्स्टंट’ पिढीला थांबून विचार करायला लावणारा हा संवाद अनेकांना भावला आहे.
‘उत्तर’ ही गोष्ट फास्ट-लाइफ जगणाऱ्या समाजातील त्या आईची आहे, जी आपल्या मुलाच्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देते, पण त्याचं भलं कशात आहे हे त्याला कळत नाही. चित्रपटाचं कथानक भावनिक असतानाच वास्तवाशी जोडलेलं आहे.
क्षितिज पटवर्धन म्हणतो, “आई हे सर्वात जवळचं, पण अनेकदा गृहीत धरलेलं नातं आहे. तिचा ‘व्यक्ती’ म्हणून विचार करायला लावणारी कलाकृती करायची होती, त्यातूनच ‘उत्तर’ हा सिनेमा जन्माला आला.”
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, “‘उत्तर’ ही आई-मुलाच्या नात्यावर भाष्य करणारी आणि आजच्या पिढीला भावणारी कथा आहे. भावना मराठी भाषेत सांगितली असली तरी ती वैश्विक आहे.”
या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल, बवेश जानवलेकर आणि जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास व संपदा वाघ यांनी केली आहे. ‘उत्तर’ हा चित्रपट १२ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
