एका क्षणी त्यांच्याकडे फक्त २४ रुपये होते. पुढच्या क्षणी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसून एक कोटी रुपये जिंकले.
पण हा विजय फक्त पैशांपुरता मर्यादित नाही. भूषणाचं स्वप्न आहे आई-वडिलांना रोजंदारीच्या कामातून मुक्त करणं आणि त्यांच्या कष्टाचं चीज करणं.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत भूषणांनी आपल्या संघर्षाचा प्रवास सांगितला. शोमध्ये सुरुवातीला त्यांना प्रचंड दडपण जाणवलं. अमिताभ बच्चनांसमोर बसल्यानंतर ते नीट बोलताही नव्हते. पण बिग बींनी लगेच प्रश्न विचारण्याऐवजी त्यांच्याकुटुंबाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल संवाद साधला. यामुळे भूषणांचा आत्मविश्वास वाढला आणि ते खेळासाठी तयार झाले.
एक कोटी जिंकल्यानंतर अमिताभ बच्चनांनी भूषणांना मिठी मारली. हा क्षण त्यांना कधीच विसरता येणार नाही. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांसमोर आई-वडिलांचा संघर्ष होता.
बिग बींनी त्यांना वडिलांना पुन्हा रोजंदारीवर काम करू देऊ नकोस, कुटुंबाची जबाबदारी स्वीकार आणि आई-वडिलांना आराम करू दे असा सल्ला दिला.
भूषणांच्या आयुष्यातली सर्वात भावनिक गोष्ट म्हणजे त्यांची आई शिक्षणासाठी स्वतःचे दागिने विकत होती. मुलाचं शिक्षण थांबू नये म्हणून तिने वेळोवेळी दागिने विकले आणि आर्थिक मदत केली.
आता त्यांची इच्छा आहे की जिंकलेल्या रकमेतून आईचे दागिने पुन्हा खरेदी करावेत. आईला तिचे सर्व दागिने परत मिळणार असल्याचा आनंद त्यांना आहे.
यशामुळे नातेवाईकांचं वागणंही बदललंय. पूर्वी एक हजार रुपयांची गरज असतानाही काही नातेवाईक मदतीला नकार देत होते. आता तेच लोक फोन करून अभिनंदन करत आहेत आणि गावाचं, जिल्ह्याचं नाव मोठं झाल्याचं सांगत आहेत.
एक कोटी जिंकल्यानंतर भूषणांसमोर सात कोटी रुपयांचा प्रश्न होता. पण त्यांनी एक कोटींच्या यशावर समाधान मानलं. पुढे त्यांचं लक्ष आई-वडिलांच्या सुखासाठी आणि आईचे दागिने परत मिळवण्यासाठी आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
