‘फौजी’ची संकल्पना दिग्दर्शक घनश्याम येडे यांच्या मनात अनेक वर्षांपूर्वी आकाराला आली. लहानपणापासून देशसेवेची इच्छा असलेल्या घनश्याम येडे यांनी महाविद्यालयीन काळात एनसीसीमध्ये काम केलं. मात्र, शारीरिक अडचणींमुळे त्यांना प्रत्यक्ष सैन्यात दाखल होता आलं नाही.
सैनिकांच्या आयुष्यातील त्याग आणि त्यांचं देशासाठी असलेलं योगदान सामान्य माणसापर्यंत पोहोचावं, या विचारातून ‘फौजी’चा प्रवास सुरू झाला. या कामात सुहास गरगडे यांची त्यांना साथ मिळाली. आर्थिक अडचणी असतानाही दोघांनी हा चित्रपट उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.
चित्रपटाची निर्मिती करताना नोटबंदी आणि कोरोना महामारीसारख्या संकटांचाही सामना करावा लागला. निधी उभारण्यासाठी बँका, पतसंस्था आणि इतर माध्यमांतून मदत मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. अनेक अडचणी असूनही चित्रपटाचं काम सुरू राहिलं.
या प्रवासात अनेक सहकाऱ्यांनी साथ दिली. वासुदेव महाराज गरुड यांच्या आशीर्वादासोबत सतीश नाझरकर, अशोक नाझरकर, गणेश गुंजाळ, डॉ. शंकर तळबे, सुनील गावडे, अशोक गाडे, प्रवीण बुरुंगे, राजेंद्र करणे, विष्णुपंत नेवाळे, शिवाजी दडस, कोंडीबा नलावडे आणि जोतीबा घाडगे यांचं सहकार्य मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे.
मात्र, चित्रपट अंतिम टप्प्यात असताना टीमला मोठा धक्का बसला. चित्रपटातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आणि घनश्याम येडे यांचे जिवलग मित्र सुहास गरगडे यांचं अपघाती निधन झालं. या घटनेनंतर चित्रपट पूर्ण करण्याचं आव्हान आणखी वाढलं.
मित्राचं स्वप्न अधुरं राहू नये, यासाठी घनश्याम येडे यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. परिस्थिती इतकी कठीण झाली की त्यांच्यावर घर आणि जमीन गहाण ठेवण्याची वेळ आली. त्यानंतर सुहास गरगडे यांच्या भूमिकेसाठी त्यांचे धाकटे भाऊ मयूर गरगडे यांना चित्रपटात सहभागी करण्यात आलं.
या कठीण काळात घनश्याम येडे यांना नाथ विश्वनाथ साहेबांचंही मार्गदर्शन मिळालं. त्यांना वडिलांसारखं मानणाऱ्या येडे यांच्या पाठीशी ते उभे राहिले. सहनिर्माती स्वप्नजा विश्वनाथ यांच्या साथीने चित्रपटाच्या पुढील कामाला मदत झाली.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाल्यानंतर आणखी एक संकट समोर आलं. नाथ विश्वनाथ साहेबांच्या प्रकृतीबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. त्यांच्या मुलीने अवयवदान करून त्यांना मदत केल्याचं सांगण्यात आलं आहे. या परिस्थितीतही ‘फौजी’च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली नाही.
घनश्याम येडे यांच्या मते, नाथ विश्वनाथ साहेब बरे झाले तर आपण पुन्हा असे अनेक चित्रपट उभे करू शकू, असा त्यांना विश्वास होता. या विश्वासामुळेच चित्रपटाचा प्रवास पुढे सुरू राहिला.
दरम्यान, ‘एकलव्य प्रतिष्ठान’ आणि सुधीरदादा पाटसकर यांनी ‘फौजी’चे प्रस्तुतकर्ता म्हणून साथ दिली. चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील देशप्रेम आणि प्रामाणिक प्रयत्न लक्षात आल्याने त्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.
‘फौजी’मध्ये सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, शाहबाज खान आणि टीनू वर्मा यांच्यासह संजय खापरे, नागेश भोसले, हंसराज जगताप, अश्विनी कासार आणि घनश्याम येडे यांच्या भूमिका आहेत.
चित्रपटाच्या संगीताची बाजूही महत्त्वाची आहे. शान, वैशाली माडे, बेला शेंडे, आदर्श शिंदे, उर्मिला धनगर आणि कविता राम यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.
अनेक अडचणी आणि संकटांवर मात केल्यानंतर आता ‘फौजी’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतीय सैनिकांचं शौर्य, त्याग आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्ष पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
‘फौजी’ 27 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. एवढ्या संघर्षातून तयार झालेली ही कथा प्रेक्षकांना किती भावते, याकडे आता लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
