पहिल्या सीझनमध्ये अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ZEE5वर 30 जानेवारी 2026 रोजी या सीरिजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला होता. कथेत शंकासूरशी जोडलेल्या मृत्यूंचा तपास आणि त्यामागचं सत्य याभोवती रहस्य उभं करण्यात आलं होतं.
‘देवखेळ 2’च्या टीझरमध्ये भयावह वातावरण, गूढ प्रसंग आणि अस्वस्थ करणारी दृश्यं पाहायला मिळतात. मात्र, कथानकाबाबत फारशी माहिती समोर आणण्यात आलेली नाही. त्यामुळे दुसऱ्या भागात नेमकं कोणतं रहस्य उलगडणार, याची उत्सुकता वाढली आहे.
या टीझरमध्ये प्राजक्ता माळीचा वेगळा अवतार पाहायला मिळतो. पहिल्या भागातील सारिका या भूमिकेच्या पुढे तिच्या व्यक्तिरेखेभोवती आता आणखी काही गूढ दडलं आहे का, असा प्रश्न टीझर पाहिल्यानंतर निर्माण होतो.
प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर टीझर शेअर करत दुसऱ्या भागाबद्दल उत्सुकता वाढवली आहे. तिच्या पोस्टमध्ये ‘नवा मर्डर, नवं रहस्य’ असा उल्लेख आहे. त्यामुळे यावेळी कथेत एका नव्या हत्येभोवती तपास आणि रहस्याची गुंतागुंत निर्माण होणार असल्याचे संकेत मिळतात.
पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादामुळे ‘देवखेळ 2’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पहिल्या सीझनमध्ये कोकणातील लोकपरंपरा आणि गुन्हेगारी तपास यांची सांगड घालण्यात आली होती. दुसऱ्या भागात ही कथा आणखी गडद आणि थरारक होण्याची शक्यता टीझरवरून दिसते.
दरम्यान, ‘देवखेळ’च्या पहिल्या भागावर कोकणातील काही स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. शंकासूर आणि नमन-खेळे या स्थानिक परंपरेचं चित्रण चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा वाद पुढे विधानसभेतही चर्चेत आला होता.
आता दुसऱ्या सीझनमध्ये कथा कोणत्या दिशेने जाते, प्राजक्ता माळीच्या व्यक्तिरेखेचं गूढ काय आहे आणि नव्या हत्येमागचं सत्य कोणतं आहे, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. ‘देवखेळ 2’च्या प्रदर्शनाची निश्चित तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
