मराठी सिनेसृष्टीत प्रयोगशील आणि गूढ कथानकांवर आधारित चित्रपटांची एक नवी लाट दिसतेय. त्यातच दिग्दर्शक सचित पाटील यांचा आगामी रहस्यपट ‘असंभव’ चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची पोस्टर्स प्रदर्शित झाली होती, आणि आता त्याचा टीझर रिलीज झाला असून तो प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर टाकतोय.
टीझरमध्ये मुक्ता बर्वे एका गूढ हवेलीत दिसते. तिच्या चेहऱ्यावरची भीती, घाबरलेले डोळे आणि शांततेत दडलेला धोका – हे सगळं पाहून अंगावर काटा येतो. तिच्या पात्राचं नेमकं काय होतंय, ती दुहेरी भूमिका करतेय का, हे स्पष्ट होत नाही. याशिवाय प्रिया बापट देखील एका रहस्यमय भूमिकेत झळकतेय. मुक्ताला पडलेली स्वप्नं, हवेलीतील गूढ घटना आणि अचानक घडणारा खून – या सगळ्यांनी टीझरला एक भेदक वळण दिलं आहे.
सचित पाटील या सिनेमात दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता या तिन्ही भूमिकांत दिसतो. त्याने सांगितलं की, “असंभव हा माझ्यासाठी फक्त रहस्यपट नाही, तर मानवी मनाच्या गाभ्यात डोकावण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक पात्रात काहीतरी गूढ दडलेलं आहे.” नयनरम्य नैनितालमध्ये झालेले शूटिंग आणि कलाकारांचा दमदार अभिनय हे या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे.
निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांनी सांगितलं की, “या चित्रपटात पारंपरिक रहस्यपटाच्या चौकटीतून बाहेर येऊन काहीतरी नवीन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कथा अशी रचली आहे की शेवटपर्यंत प्रेक्षकांना अंदाज बांधता येणार नाही.”
‘असंभव’ची निर्मिती मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटच्या सचित पाटील आणि नितीन वैद्य यांनी केली आहे. सहनिर्मिती शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार यांनी केली आहे. सहदिग्दर्शनाची जबाबदारी पुष्कर श्रोत्री यांनी सांभाळली आहे.
या चित्रपटात सचित पाटीलसोबत मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘असंभव’ २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे, आणि हा सिनेमा प्रेक्षकांना थरार, भावना आणि गूढतेचा अनुभव देईल, असा विश्वास टीमने व्यक्त केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
