भाग्यश्री लिमयेपासून सयाजी शिंदेंपर्यंत दिग्गजांची फौज; ‘मांजर’चा टीझर चर्चेत

Manjar Movie Teaser: मराठी मनोरंजनविश्वात आणखी एक हलकाफुलका आणि मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टरमुळे चर्चेत आलेल्या ‘मांजर’ या चित्रपटाचा टीझर आता प्रदर्शित झाला आहे. चार मित्रांचं बिनधास्त आयुष्य, त्यांची मैत्री आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळते.

सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये या चार कलाकारांभोवती टीझरची कथा फिरताना दिसते. चौघांचे स्वभाव वेगवेगळे आहेत. मात्र, एकत्र आल्यानंतर सुरू होणारी त्यांची धमाल आणि धावपळ प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते.

मित्रांमधील मस्ती, संवाद आणि वेगवेगळ्या प्रसंगांमधला गोंधळ पाहता ही कथा पुढे नेमकी कुठे जाणार, याची उत्सुकता निर्माण होते. या चार पात्रांमधील धमाल केमिस्ट्री चित्रपटाची खासियत ठरण्याची शक्यता आहे.

या मित्रांच्या विश्वात भाग्यश्री लिमये नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत सयाजी शिंदे यांची भूमिकाही लक्षवेधी ठरते. अंशुमन विचारे, वैष्णवी अंधाडे आणि अश्विनी काळसेकर यांचीही टीझरमध्ये झलक पाहायला मिळते.

अनेक लोकप्रिय कलाकारांचा सहभाग असल्यामुळे ‘मांजर’ हा मल्टिस्टारर चित्रपट ठरणार आहे. त्यामुळे विनोद आणि अभिनयाची चांगली मेजवानी प्रेक्षकांना मिळण्याची अपेक्षा आहे.

मात्र, टीझरचा सर्वाधिक चर्चेचा भाग शेवटी येतो. काही वेळासाठी सर्व काही सामान्य वाटत असतानाच मांजराचा आवाज ऐकू येतो. याच क्षणी चित्रपटाच्या नावामागचं गूढ आणखी वाढतं.

या मांजराचा चार मित्रांच्या आयुष्यात नेमका काय संबंध आहे? ते मांजर कोणता ट्विस्ट घेऊन येणार? हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. चित्रपटाचं नाव ‘मांजर’ का ठेवण्यात आलं आहे, याचं उत्तरही सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

दिग्दर्शक सुशील महादेव यांच्या मते, ‘मांजर’ची कल्पना एका मजेशीर विचारातून पुढे आली. चार मित्रांचं आयुष्य, त्यांची मैत्री आणि त्यांच्या स्वभावातून निर्माण होणाऱ्या परिस्थिती या कथेचा आधार आहेत. सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांची केमिस्ट्री चांगली जमल्याचंही त्यांनी सांगितलं.

चित्रपटात मैत्री, विनोद आणि धमाल यांचा मिलाफ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व वयोगटातील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे.

एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राईट फिल्म्स निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. हर्ष, अविनाश शर्मा, हरि राजपूत, बंटी नागी आणि जसबीर नागी यांनी निर्मिती केली आहे. एए फिल्म्सकडे चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी आहे.

‘मांजर’ 18 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टीझरच्या शेवटी ऐकू आलेला तो आवाज नेमका कोणता ट्विस्ट घेऊन येतो, हे जाणून घेण्यासाठी आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page