एप्रिल महिन्यात ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. त्यानंतर अवघ्या 50 दिवसांत 25 प्रयोग पूर्ण झाले. आता चार महिन्यांत नाटकाचा 50 वा प्रयोग रंगणार असून, हा टप्पा संपूर्ण टीमसाठी खास असल्याचं सिद्धार्थ जाधवने सांगितलं.
सिद्धार्थ म्हणाला की, अभिनेता आणि निर्माता अशी दुहेरी जबाबदारी स्वीकारताना सुरुवातीला थोडी भीती होती. प्रेक्षक हे नाटक स्वीकारतील की नाही, अशी धाकधूक मनात होती. मात्र प्रत्येक प्रयोगानंतर मिळालेल्या प्रेमामुळे आणि टाळ्यांच्या कडकडाटामुळे संपूर्ण टीमचा आत्मविश्वास वाढत गेला.
त्याने सांगितले की, ‘अॅनिमल’ची निर्मिती केवळ व्यावसायिक हेतूने नव्हे, तर प्रेक्षकांसमोर विचार करायला लावणारा विषय मांडण्यासाठी करण्यात आली. या प्रवासात लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांची साथ मोलाची ठरल्याचेही त्याने नमूद केले.
या नाटकाचे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रयोग होत आहेत. भाषा बदलली तरी नाटकातील भावना आणि नात्यांची गुंतागुंत प्रेक्षकांपर्यंत तितक्याच प्रभावीपणे पोहोचत असल्याचा आनंदही सिद्धार्थने व्यक्त केला.
नाटकात तो दत्तात्रय मांजरसुंभेकर ऊर्फ दत्तू ही भूमिका साकारत आहे. आई, बहीण आणि कुटुंबाशी संबंधित प्रसंग साकारताना स्वतःच्या आयुष्यातील आठवणी जाग्या होतात. त्यामुळे प्रत्येक प्रयोग हा त्याच्यासाठी केवळ अभिनय नसून भावनिक अनुभव ठरतो, असं तो म्हणाला.
येत्या रविवारी पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नाटकाचा 50 वा प्रयोग सादर होणार आहे. या प्रयोगालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सिद्धार्थने व्यक्त केला.
दरम्यान, महेश मांजरेकर यांनीही सिद्धार्थ जाधवच्या अभिनयाचे आणि निर्माता म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले. ‘लालबाग-परळ’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ आणि ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’मधील त्याच्या भूमिका उल्लेखनीय असल्याचे सांगत, ‘अॅनिमल’मधूनही तो वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकत असल्याचं त्यांनी म्हटलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
