मानसिक आरोग्याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यात डॉ. नाडकर्णी यांचं मोठं योगदान होतं. मानसिक आजारांकडे भीतीने न पाहता, तो इतर आजारांसारखाच असल्याची जाणीव त्यांनी लोकांमध्ये निर्माण केली. त्यांच्या साध्या आणि संवेदनशील मांडणीमुळे अनेक रुग्णांना आणि कुटुंबियांना आधार मिळाला.
१९८० मध्ये एमबीबीएस आणि १९८४ मध्ये मनोविकारशास्त्रात एमडी पूर्ण केल्यानंतर त्यांनी मानसिक आरोग्य क्षेत्रात वेगळा मार्ग निवडला. त्यांनी १९९० मध्ये ठाण्यात ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ’ (IPH) या संस्थेची स्थापना केली. ही संस्था पुढे मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि वैयक्तिक विकासासाठी मोठं केंद्र बनली.
डॉ. नाडकर्णी यांनी उपचारांसोबत कला आणि साहित्याचाही वापर केला. संगीत, नाटक आणि संवाद यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत मानसिक आरोग्याचा विषय पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
वैद्यकीय क्षेत्रासोबतच मराठी साहित्य आणि नाट्यक्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला. ‘गद्धेपंचविशी’, ‘विषादयोग’, ‘एका सायकिॲट्रिस्टची डायरी’ आणि ‘शहाण्यांचा सायकिअॅट्रिस्ट’ यांसारखी त्यांची पुस्तकं खूप गाजली. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारही मिळाले होते.
नाटककार म्हणूनही त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’, ‘मयसभा’ आणि ‘त्या तिघांची गोष्ट’ यांसारख्या नाटकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मानसिक आजारांवरील गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी ‘जन्मरहस्य’ हे नाटकही लिहिलं होतं.
प्रसिद्ध नाटक ‘गेट वेल सून’ यामागील मूळ संकल्पनाही त्यांचीच होती. व्यसनमुक्ती, कौटुंबिक संघर्ष आणि मानसिक ताण यांसारखे विषय त्यांनी प्रभावीपणे हाताळले.
त्यांच्या निधनानंतर अनेक साहित्यिक, कलाकार आणि डॉक्टरांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारा संवेदनशील डॉक्टर, विचारवंत आणि मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
