Yogita Chavan Serial: अभिनेत्री योगिता चव्हाण पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतून घराघरात पोहचलेल्यानंतर आणि बिग बॉस मराठीमधील सहभागानंतर तिने थोडा ब्रेक घेतला होता. आता नवीन मालिकेतून ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.
‘तू अनोळखी तरी सोबती’ नावाची ही मालिका सन मराठीवर सुरू होणार आहे. यात योगिता ‘अर्पिता’ची भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत अभिनेता अंबर गणपुळे मुख्य भूमिकेत दिसणार असून तो ‘समर’ची भूमिका करेल. अंबर यापूर्वी ‘दुर्गा’ आणि ‘रंग माझा वेगळा’ मालिकांमध्ये झळकला आहे.
या मालिकेची कथा समीर नावाच्या मुलाभोवती फिरते, जो मुंबईत राहणारा आहे. एका मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त तो गणपती बाप्पाच्या दर्शनाला येतो आणि प्रसाद म्हणून केक अर्पण करतो. गुरुजी तो केक अर्पिताला देतात. ती आश्चर्यचकित होत सांगते की आज तिचा वाढदिवस आहे. याच भेटीतून पुढे दोघांच्या नात्याचा प्रवास कसा घडतो, हे मालिकेत दिसणार आहे.
‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिका 5 जानेवारी 2026 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रोमो पाहून प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि योगिताला शुभेच्छा पाठवल्या आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत योगिता आणि अभिनेता सौरभ चौगुले यांच्या नात्याविषयी चर्चा रंगल्या आहेत. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलं. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दोघांनी अद्याप दिलेली नाही. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं आणि त्यांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडायची.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
