Uttar Movie Review: अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे यांचा ‘उत्तर’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरतो आहे. चित्रपटगृहात मिळणारा प्रतिसाद पाहता टीमही भारावून गेली आहे. विशेषतः अभिनय बेर्डेच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून टीम विविध थिएटरमध्ये भेटी देत आहे. शो संपल्यानंतर प्रेक्षक कलाकारांशी संवाद साधत आहेत. अनेक ठिकाणी अभिनय बेर्डेभोवती गर्दी होत असल्याचं चित्र आहे. काही आया त्याला भेटताना भावुक होत असल्याचंही पाहायला मिळत आहे. प्रेक्षक त्याला आपल्याच घरातला मुलगा मानत आहेत, हीच या चित्रपटाच्या यशाची खरी ओळख ठरत आहे.
सर्व वयोगटातील प्रेक्षकांना ‘उत्तर’ भावतो आहे. पडद्यावर दिसणाऱ्या व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूच्या वाटतात. रेणुका शहाणे यांनी साकारलेली आई अनेकांना स्वतःच्या आईची आठवण करून देते. तर ‘नन्या’ हे पात्र घरात किंवा शेजारी असावं, असं भासतं. रेणुका शहाणेंचा संयमित अभिनय आणि अभिनय बेर्डेचा सहज व प्रामाणिक अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
अनेक प्रेक्षक आणि समीक्षकांच्या मते, हा अभिनय बेर्डेच्या कारकिर्दीतील आजवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. अवघ्या काही दिवसांतच सिनेसृष्टीतील मान्यवरांनी त्याच्या कामाचं कौतुक केलं असून काहींनी त्याला ‘डिस्कव्हरी’ असंही म्हटलं आहे.
दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनीही याबाबत भावना व्यक्त केल्या. अभिनयची निवड करताना काही शंका व्यक्त झाल्या होत्या, पण आज थिएटरमधील प्रतिसाद पाहून निर्णय योग्य ठरल्याचं ते सांगतात. भूमिकेसाठी अभिनयने दहा महिने मेहनत घेतली. पात्राच्या हालचाली, बोलणं, वागणं यावर सातत्याने काम केलं. यासाठी त्याने १२–१३ किलो वजन कमी केल्याचंही त्यांनी नमूद केलं. थिएटरमध्ये ‘नन्या सुपर्ब!’ अशी दिलखुलास दाद ऐकून आपण भरून पावलो, असंही ते म्हणाले.
झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट यांच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे आणि निर्मिती सावंत यांच्या भूमिका आहेत. याशिवाय पहिल्यांदाच एआय पात्र ‘अनमिस’ ही चित्रपटात पाहायला मिळत आहे. वाढता प्रतिसाद पाहता शोजमध्येही वाढ होत असल्याचं चित्र आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
