‘चाकरी’ हे रोमँटिक आणि नृत्यप्रधान मराठी नॉन-फिल्म गाणं आहे. प्रेम आणि नात्यातील वेगवेगळे टप्पे या गाण्यातून मांडण्यात आले आहेत. आतापर्यंत ग्लॅमरस लूकमध्ये दिसलेली तन्वी या म्युझिक व्हिडीओमध्ये मात्र वेगळ्याच रूपात पाहायला मिळते.
या गाण्यात तन्वीचे दोन वेगवेगळे लूक पाहायला मिळतात. एका भूमिकेत ती तरुण मुलीच्या रूपात दिसते, तर दुसऱ्या भूमिकेत तिने उतारवयातील स्त्रीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा अनुभव वेगळा आणि आव्हानात्मक ठरला.
‘चाकरी’च्या निमित्ताने तन्वीने लोकप्रिय व्हायरल क्रिएटर प्रणित काळोखेसोबत पहिल्यांदाच काम केलं आहे. गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये एका जोडप्याच्या आयुष्यातील दोन टप्पे दाखवण्यात आले आहेत. तरुण वयातील प्रेम, त्यातील निरागसता आणि उत्साह यासोबतच पुढील आयुष्यातील सहवास, प्रेम आणि एकमेकांप्रती असलेली निष्ठा यावर गाण्याची कथा आधारित आहे.
लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणे यांच्या आवाजात हे गाणं साकारण्यात आलं आहे. तन्वीचा अभिनय, गाण्याची कथा आणि दोन्ही गायकांचा आवाज यामुळे ‘चाकरी’कडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
आपल्या पहिल्या अल्बम साँगबद्दल बोलताना तन्वीने हा प्रोजेक्ट आपल्यासाठी खास असल्याचं सांगितलं. ‘बिग बॉस मराठी’चा किताब जिंकल्यानंतरचं हे तिचं पहिलं काम असल्याने ती या गाण्याबद्दल उत्सुक आहे. तसेच सारेगमसोबत काम करण्याची तिची इच्छा या गाण्यामुळे पूर्ण झाल्याचंही तिने सांगितलं.
गाण्यात उतारवयातील स्त्रीची भूमिका साकारणं सुरुवातीला थोडं आव्हानात्मक वाटलं, असं तन्वीने सांगितलं. मात्र, दोन्ही लूक तिला आवडले असून ही भूमिका साकारण्याचा अनुभवही खास असल्याचं तिने म्हटलं.
दरम्यान, गाण्यातील नायकाप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही आपली ‘चाकरी’ करणारा कोणीतरी लवकर भेटावा, अशी मजेशीर इच्छाही तन्वीने व्यक्त केली. तिच्या या वक्तव्याचीही सध्या चर्चा होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
