Rubaab Movie: नवनवीन विषयांवर चित्रपट सादर करणाऱ्या झी स्टुडिओजकडून मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळी लव्हस्टोरी येत आहे. ‘रुबाब’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, पहिल्याच झलकितून चित्रपटाची उत्सुकता वाढताना दिसते. ‘तुझ्यासारखी नको… तूच पाहिजे’ ही ओळ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
टीझरमध्ये एका आत्मविश्वासू तरुणाची प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. ही फक्त गोड प्रेमकथा नाही, तर प्रेमासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असलेल्या नायकाची गोष्ट आहे. स्वतःचे नियम स्वतः ठरवणारा नायक आणि त्याची ड्रीम गर्ल यांच्यातील नातं तरुण प्रेक्षकांना आपलंसं वाटणारं आहे. भावना आणि स्वॅग यांचा समतोल टीझरमध्ये स्पष्टपणे दिसतो.
दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे सांगतात की, ‘रुबाब’ ही आजच्या पिढीची कथा आहे. स्वतःचा आवाज असलेली, ठाम विचारांची तरुणाई आणि त्यांचं प्रामाणिक प्रेम या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. आजच्या नात्यांमधला अॅटिट्यूड दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जनावलेकर यांच्या मते, मराठी प्रेक्षकांना नेहमीच फ्रेश आणि स्टायलिश आशय अपेक्षित असतो. ‘रुबाब’ केवळ रोमँटिक चित्रपट नसून, स्वतःच्या तत्वांवर जगण्याची आणि प्रेमासाठी ठाम उभं राहण्याची कथा आहे.
झी स्टुडिओज प्रस्तुत आणि झणकर फिल्म्स निर्मित ‘रुबाब’ चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन शेखर बापू रणखांबे यांनी केलं आहे. संजय झणकर आणि गौरी झणकर हे निर्माते आहेत. चित्रपटात संभाजी ससाणे आणि शितल पाटील प्रमुख भूमिकेत दिसणार असून, ‘रुबाब’ हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
