‘नटरंग’नंतर पुन्हा तमाशापट; रवी जाधवांचा ‘फुलवरा’ 14 जानेवारीला मोठ्या पडद्यावर

Phulvara Marathi Movie: लावणीचा ठेका, लोककलेचा बाज आणि मराठी मातीचा गंध घेऊन दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘नटरंग’नंतर तब्बल 16 वर्षांनी झी स्टुडिओज आणि रवी जाधव ही जोडी लावणीप्रधान चित्रपटासाठी एकत्र आली आहे. ‘फुलवरा’ या आगामी मराठी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली असून, मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर म्हणजेच 14 जानेवारी 2027 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या घोषणेसोबत त्याचं पोस्टरही समोर आलं आहे. पोस्टरमध्ये पूजेच्या ताटात देवी अंबाबाईचा मुखवटा पाहायला मिळतो. त्यासोबत ‘आई अंबाबाईचा आशीर्वाद घ्या आणि अस्सल मराठी लावणीला बळ द्या’ अशी ओळ आहे. या टॅगलाईनमधील ‘अस्सल मराठी लावणी’ या शब्दांमुळे चित्रपटात लावणीच्या पारंपरिक रूपासोबतच तिचं आजच्या काळाशी असलेलं नातं कसं मांडलं जाणार, याची उत्सुकता वाढली आहे.

मात्र ‘फुलवरा’ची नेमकी कथा काय आहे, लावणीच्या जगण्याशी तिचा संबंध कसा जोडला जाणार आणि या कथेत कोणते कलाकार दिसणार, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

लोककलेच्या विश्वात वेगळ्या सादरीकरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘द फोक आख्यान’चे हर्ष-विजय या संगीतकार जोडीने चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर ‘द फोक आख्यान’चे लेखक आणि सादरकर्ते ईश्वर ताराबाई अंधारे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत.

लोककलेचा अभ्यास, नव्या पिढीची लोकसंगीताकडे पाहण्याची दृष्टी आणि रवी जाधव यांचा या कलेशी असलेला दीर्घ अनुभव यांचा संगम ‘फुलवरा’मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लावणी केवळ रंगमंचावर सादर होणारी कला म्हणून न दाखवता, तिच्यामागची संस्कृती, परंपरा आणि बदलतं स्वरूप यांचाही वेध चित्रपटातून घेतला जाणार असल्याचं दिसतं.

‘फुलवरा’बद्दल बोलताना दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘नटरंग’नंतर तब्बल 16 वर्षांनी पुन्हा तमाशापट करण्याचं धाडस करत असल्याचं सांगितलं. त्यांच्या मते, तमाशा ही महाराष्ट्राच्या लोककलेची ओळख आहे आणि लावणी या कलेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या समृद्ध परंपरेवर चित्रपट साकारणं ही मोठी जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं.

‘नटरंग’ची कथा 70च्या दशकात घडत होती, तर ‘फुलवरा’ची कथा 2015 मधील असल्याचं रवी जाधव यांनी सांगितलं. गेल्या काही दशकांत महाराष्ट्रातील तमाशाच्या सादरीकरणात अनेक बदल झाले. मात्र, तमाशा कलावंतांची आपली अस्सल कला जपण्याची आणि ती प्रेक्षकांसमोर सादर करण्याची धडपड आजही कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं. या प्रवासात कलावंतांनी केलेला संघर्ष आणि त्यागही चित्रपटातून समोर येणार आहे.

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही ‘नटरंग’नंतर झी स्टुडिओज, रवी जाधव आणि लावणीप्रधान चित्रपट हे समीकरण पुन्हा पाहायला मिळत असल्याचा आनंद व्यक्त केला. ‘फुलवरा’च्या निमित्ताने नव्या वर्षाची सुरुवात आश्वासक असल्याचं त्यांनी म्हटलं असून, चित्रपटातून मराठी लावणीचं अस्सल रूप प्रेक्षकांसमोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित ‘फुलवरा’ 14 जानेवारी 2027 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील कलाकार कोण असतील, लावणीचा नेमका कोणता रंग यात पाहायला मिळणार आणि पडद्यामागची कथा काय असेल, याबाबत आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page