Marathi Movies:
मराठी चित्रपट प्रेमींसाठी एक खास आनंदाची बातमी आहे. जुने मराठी चित्रपट पुन्हा एकदा नव्या रुपात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. त्याही मोफत. ही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी नुकतीच केली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘चित्रपट रसास्वाद’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यामागचा उद्देश म्हणजे मराठी चित्रपटांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि दर्जेदार सिनेमा पाहणारा रसिकवर्ग घडवणे. उद्घाटन सोहळ्यात प्रभात फिल्म कंपनी निर्मित ऐतिहासिक चित्रपट ‘संत तुकाराम’ प्रदर्शित करण्यात आला. पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘चित्रपट रसास्वाद’मुळे जुन्या काळातील गाजलेले आणि ऐतिहासिक चित्रपट तसेच नव्या पिढीचे विचारप्रवर्तक चित्रपट मोफत पाहता येणार आहेत. सिनेमा हा केवळ मनोरंजनासाठी नसून समाजपरिवर्तनाचं प्रभावी साधन आहे, असं मतही व्यक्त करण्यात आलं.
‘संत तुकाराम’ या 1936 साली बनलेल्या चित्रपटाने मराठीच नव्हे तर जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवला होता. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगातील सर्वोत्तम दहा चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. या प्रदर्शनामुळे प्रेक्षकांना मराठी सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळाची झलक अनुभवायला मिळाली.
या उपक्रमाबद्दल बोलताना आशिष शेलार म्हणाले, “आपण आई-वडिलांसोबत पाहिलेले जुने चित्रपट संस्कार घडवणारे होते. असे ऐतिहासिक चित्रपट पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. प्रगतीच्या धावत्या वेगात सांस्कृतिक जडणघडीलाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. म्हणूनच शासन कला, साहित्य, नाटक आणि चित्रपट या क्षेत्रात सातत्याने काम करत आहे.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
