MIFF 2026 ला दमदार प्रतिसाद; 92 भारतीय आणि 52 आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत

MIFF 2026: Mumbai International Film Festival: मुंबईत 15 ते 21 जूनदरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF 2026) रंगणार आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) आयोजित या महोत्सवाचे हे 19 वे पर्व असून माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांच्या माध्यमातून जगभरातील दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

यंदाच्या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला असून एकूण 1459 चित्रपटांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी स्पर्धा विभागासाठी 144 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. या निवडीत 92 भारतीय आणि 52 आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे. तसेच स्पर्धाबाह्य विभागात 202 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

1990 पासून सुरू असलेल्या या द्वैवार्षिक महोत्सवाने चित्रपटविश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. यावर्षी 46 देशांतील चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ‘बेस्ट ऑफ फेस्टिव्हल्स’, ‘ऑस्कर विजेते चित्रपट’, ‘रेमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह’, ‘एनएफडीसी रिस्टोर्ड फिल्म्स’ आणि ‘इकोज फ्रॉम नॉर्थईस्ट’ यांसारख्या विशेष विभागांचाही समावेश करण्यात आला आहे.

महोत्सवातील प्रमुख आकर्षणांमध्ये ज्येष्ठ अॅनिमेशन दिग्दर्शक रेमंड क्रुमे यांचा विशेष रेट्रोस्पेक्टिव्ह आणि मास्टरक्लास असणार आहे. तसेच प्रसिद्ध माहितीपट निर्माते डेव्हिड अ‍ॅटनबरो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘सीक्रेट्स ऑफ वाइल्ड इंडिया’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

यंदा प्रथमच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सहकार्याने मराठी माहितीपट आणि लघुपटांचे विशेष प्रदर्शन होणार आहे. दादरमधील रविंद्र नाट्य मंदिर येथे 16 ते 20 जूनदरम्यान दररोज सायंकाळी 19 निवडक मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत.

महोत्सवादरम्यान 10 मास्टरक्लास, नॉलेज सिरीज, भारतीय माहितीपट निर्माते संघटनेचा ओपन फोरम आणि ‘वेव्हज डॉक बाजार’चे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय चित्रपटनिर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर लक्षात घेऊन एआय फिल्ममेकिंग हॅकाथॉनही आयोजित करण्यात येणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन आणि समारोप प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात होणार आहे. एनएफडीसी संकुलासह मुंबईतील विविध ठिकाणी चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तसेच काही महाविद्यालयांमध्येही विशेष स्क्रीनिंग होणार आहेत.

यावर्षी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विभागांमध्ये एकूण 18 पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारांसाठी 45 लाख रुपयांची बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देखील प्रदान करण्यात येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाने मराठी माहितीपटांसाठी दिली जाणारी आर्थिक मदत 10 लाख रुपयांवरून 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण माहितीपट निर्मितीला मोठे प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page