पी.पी. सिनेप्रोडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले असून, कथा आणि पटकथा कैलास वाघमारे यांनी लिहिली आहे. चित्रपटाची निर्मिती मायकल थेवर आणि सुषमा थेवर यांनी केली आहे.
चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे आणि स्नेहलता तागडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर क्रिश मोरे याने ‘खालिद’ ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.
चित्रपटाची कथा खालिद या निरागस मुस्लिम मुलाभोवती फिरते. शाळेत त्याला ‘अफजलखान’ म्हणून चिडवले जात असल्याने त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांची उत्तरे शोधताना तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी परिचित होतो आणि माणुसकी, समानता तसेच सामाजिक सलोखा यांचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
दिग्दर्शक राज प्रितम मोरे यांनी सांगितले की, हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट असून तो पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन वर्षे मेहनत घेतली. आता हा चित्रपट ओटीटीच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
निर्माते मायकल थेवर यांच्या मते, समाजाला एकत्र आणणाऱ्या कथा आजच्या काळात अधिक महत्त्वाच्या आहेत. खालिदच्या प्रवासातून धर्म आणि जातीच्या पलीकडे माणुसकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
या चित्रपटाची कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या Marché du Film, IFFI Indian Panorama 2025 आणि अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विशेष प्रदर्शनासाठीही निवड झाली होती. विदर्भातील अकोला, अमरावती आणि नागपूर परिसरात चित्रित झालेल्या या चित्रपटात अस्सल वऱ्हाडी भाषेचा वापर आणि स्थानिक कलाकारांचा सहभागही पाहायला मिळतो.
चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्याची संधी चुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता तो विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला असून, संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासारखा विचारप्रवर्तक चित्रपट म्हणून त्याची चर्चा होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
