Asambhav Movie: मराठी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि लेखन क्षेत्रात स्वतःची वेगळी छाप सोडणारे कपिल भोपटकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा नवा चित्रपट ‘असंभव’ येत्या 21 नोव्हेंबरला ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ (IFFI) मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा कपिल यांनी स्वतः लिहिली आहे.
गेल्या तीन दशकांत कपिल यांनी रंगभूमीवर अनेक वेगवेगळे प्रयोग केले. 1990 च्या दशकात पोद्दार कॉलेजमध्ये असताना त्यांनी सात एकांकिका लिहिल्या आणि त्या आंतरकॉलेज स्पर्धांमध्ये गाजल्या. त्यांची पहिली एकांकिका ‘जल्लोष’ आता ‘झेप’ या पटकथेत रूपांतरित होत असून तीही लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
कपिल यांचा व्यावसायिक प्रवास ‘शांती’ मालिकेत सहाय्यक संवाद लेखक म्हणून सुरू झाला. 1998 मध्ये त्यांनी विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ या कादंबरीचं रंगमंचीय रूपांतर केलं आणि त्या नाटकाने अनेक पुरस्कार जिंकले. रिचर्ड बाक यांच्या ‘जोनाथन लिविंगस्टोन सिगल’चे मराठी नाट्यरूपांतर दिग्दर्शित करून त्यांनी 1999 मधील मानाची ‘सवाई ट्रॉफी’ पटकावली. या नाटकातून प्रियदर्शन जाधव, जितेंद्र जोशी आणि मधुरा वेलणकर यांसारख्या कलाकारांचा प्रवास सुरू झाला.
टेलिव्हिजनमध्येही त्यांनी वेगळं स्थान निर्माण केलं. ‘सनसनी’, ‘आक्रीत’, ‘श्रावणसरी’, ‘कगार’ आणि ‘थरार’ अशा मालिकांमधून त्यांनी सतत नवे प्रयोग केले. दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या ‘माझा खेळ मांडू दे’ या नाटकावर आधारित ‘रैन बसेरा’ ही टेलिफिल्मही त्यांनी लिहिली. 2025 मध्ये झी फायवर प्रदर्शित झालेल्या मराठीतील पहिल्या वेबसीरिज ‘अंधारमाया’ ची पटकथाही त्यांचीच.
कपिल यांच्या लेखनात वास्तव, भावना आणि नात्यांचं सूक्ष्म वर्णन नेहमी दिसतं. त्यांची कथा फक्त मनोरंजनापुरती मर्यादित राहत नाही, तर प्रेक्षकाला एक अनुभव देत जाते. आता ‘असंभव’मधून ते पुन्हा नव्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर येत आहेत, आणि IFFI मधील प्रदर्शनाामुळे या चित्रपटाकडे आधीच उत्सुकता वाढली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
