Divya Shinde Evicted from Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’ सीझन 6 सुरुवातीपासूनच वादामुळे चर्चेत आहे. घरातील सततचे वाद, भांडणं आणि काही स्पर्धकांची आक्रमक भाषा यामुळे शोवर वारंवार प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेकदा सूचना देऊनही काहींच्या वागण्यात बदल न झाल्याचं दिसून आलं.
या सगळ्यात एक गंभीर प्रकार घडला. स्पर्धक दिव्या शिंदे हिने घरात थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाला. हा प्रकार ‘बिग बॉस’च्या नियमांचा भंग असल्याने तिला तात्काळ शोमधून बाहेर काढण्यात आलं. दिव्याला सोशल मीडियावर ‘सरकार’ या नावाने ओळखलं जात होतं. मात्र राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर हिंसाचाराची भाषा वापरल्याने तिच्यावर कठोर कारवाई करण्यात आली.
घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. या स्टोरीमध्ये तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसंच, “लवकरच सर्व गोष्टी स्पष्ट करेन” असंही तिने म्हटलं आहे. “सध्या अनेक गोष्टी सुरू आहेत. काळजी करू नका. मी लवकरच लाईव्ह येऊन तुमच्याशी बोलेन. सत्य नक्की समोर येईल,” असा तिचा संदेश आहे.
दिव्याच्या निष्कासनानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही समर्थक तिच्या बाजूने पोस्ट करत आहेत. तर अनेक प्रेक्षकांनी तिच्या भाषेवर नाराजी व्यक्त करत बिग बॉसच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.
हा वाद एका टास्कदरम्यान सुरू झाला. तन्वी कोल्तेने दिव्याचं नाव घेतल्याने वातावरण तापलं. रागाच्या भरात दिव्याने स्वतःला ‘सरकार’ म्हणत बाहेर तलवार बाळगते आणि गरज पडल्यास ती वापरू शकते, असं विधान केलं. हा प्रकार गंभीर मानून बिग बॉसने तिला माफी मागण्याची संधी दिली होती. मात्र दिव्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे अखेर बिग बॉस मराठी टीमने तिला शोमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.
आता या घटनेनंतर घरात पुढे काय घडणार आणि याचा शोवर काय परिणाम होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
