चित्रपटाच्या नफ्यातील रक्कम गरजू विद्यार्थ्यांच्या, विशेषतः आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच केली होती. आता या मदतीबाबतची माहिती त्यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे.
प्रवीण तरडे यांनी सांगितलं की, विनायक हेगाणा, राज देशमुख आणि मकरंद अनासपुरे यांच्या सल्ल्याने मराठवाडा आणि विदर्भातील 200 विद्यार्थ्यांच्या तीन वर्षांच्या जेवणाचा खर्च उचलण्यात आला आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तीन मुलांच्या परदेशातील वैद्यकीय शिक्षणाचा खर्चही स्वीकारण्यात आला आहे.
याशिवाय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून, नाशिकमधील 25 मुलींच्या शिक्षणाचा खर्चही उचलण्यात आला आहे. पुढील काळातही चित्रपटातून मिळणारा सर्व नफा अशाच समाजोपयोगी कामांसाठी वापरण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
या उपक्रमाचं मराठी चित्रपटसृष्टीतून मोठं कौतुक होत आहे. अभिजीत पानसे, अवधूत गुप्ते, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, सुबोध भावे, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, क्षितीश दाते, अभिजीत खांडकेकर, विजू माने आणि सलील कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकारांनी प्रवीण तरडे यांचं अभिनंदन केलं.
चित्रपटाच्या यशानंतर प्रवीण तरडे यांनी ‘देऊळ बंद 3’ या पुढील भागाचीही घोषणा केली. गुहागर ते अमेरिका असा या चित्रपटाचा प्रवास असणार असून, ‘आत्मनिर्भर भारत’ हा त्याचा मुख्य विषय असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी प्रवीण तरडे यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचेही आभार मानले. स्पॉटबॉय, सहाय्यक दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कॅमेरामन आणि कलाकार अशा प्रत्येकाच्या मेहनतीमुळेच हे यश मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
