नव्वदच्या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरलेली ‘दामिनी’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. पत्रकारितेच्या ताकदीवर अन्यायाविरुद्ध लढणारी दामिनी आता नव्या रूपात आणि नव्या पिढीच्या प्रश्नांसह परत येणार आहे.
पहिल्या सिझनमध्ये प्रतीक्षा लोणकर यांनी दामिनीची भूमिका साकारली होती आणि तब्बल पाच वर्षं ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. आता ‘दामिनी २.०’मध्ये साताऱ्याची अभिनेत्री किरण पावसे ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत पुण्याचा ध्रुव दातार नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.
ही नवी दामिनी आपल्या आजीचा वारसा घेऊन पत्रकारितेच्या क्षेत्रात अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी सज्ज आहे. तिची प्रेरणा आणि जिद्द जुन्याच दामिनीप्रमाणे तगडी आहे.
‘दामिनी २.०’ ही मालिका १३ ऑक्टोबरपासून दररोज सायं ७.३० वाजता सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. नव्या दमाचे कलाकार असतानाही, प्रेक्षकांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सुबोध भावे आणि क्षिती जोग हे कलाकारही या मालिकेत दिसणार आहेत.
या मालिकेची मूळ संकल्पना स्व. गौतम अधिकारी आणि मार्कंड अधिकारी यांची आहे. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन कांचन अधिकारी यांचे असून विठ्ठल डाकवे हे एपिसोड दिग्दर्शक आहेत. संवाद आणि कथाविस्तार अभिजित पेंढारकर यांनी लिहिले आहेत.
मुंबई दूरदर्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. पहिल्या दामिनीप्रमाणेच या नव्या मालिकेलाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
