वैभव तत्त्ववादी-पूजा सावंत पुन्हा एकत्र; ‘भेटली तू पुन्हा २’ची अधिकृत घोषणा

Bhetali Tu Punha 2 Officially Announced: २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या लोकप्रिय मराठी चित्रपट ‘भेटली तू पुन्हा’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, ‘भेटली तू पुन्हा २’ आता २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.

पहिल्या भागाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता दुसऱ्या भागात कथा कोणत्या नव्या टप्प्यावर पोहोचणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे. सोशल मीडियावरही या घोषणेचे स्वागत होत असून, अनेकांनी चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

या चित्रपटात पुन्हा एकदा वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांची लोकप्रिय जोडी एकत्र दिसणार आहे. पहिल्या भागातील दोघांची केमिस्ट्री, सहज अभिनय आणि भावनिक प्रेमकथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे सिक्वेलमध्येही हीच जोडी कायम ठेवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

‘स्वरूप स्टुडिओज’च्या बॅनरखाली प्रभाकर परब, सचिन नारकर आणि विकास पवार या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पहिल्या भागाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे हेच या सिक्वेलचेही दिग्दर्शन करणार आहेत. तर कथा आणि पटकथा संजय जमखंडी यांनी लिहिली आहे.

सिक्वेलबाबत बोलताना चंद्रकांत कणसे यांनी सांगितले की, पहिल्या चित्रपटाला प्रेमकथा, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. त्याच प्रेमामुळे दुसरा भाग तयार करण्याचे धाडस केले आहे. यावेळी कथा अधिक परिपक्व असेल. काळानुसार पात्रांच्या आयुष्यात झालेले बदल, त्यांचे नाते आणि त्यातून निर्माण होणारे भावनिक प्रसंग या चित्रपटात पाहायला मिळतील. त्यामुळे हा चित्रपट केवळ सिक्वेल नसून पहिल्या भागाच्या कथेला पुढे नेणारा प्रवास असेल.

निर्मात्यांच्या माहितीनुसार, नव्या पिढीला जोडणारी कथा मांडताना पहिल्या भागातील प्रेमकथेचा गाभा कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबरमध्ये सुरू होणार असून त्यानंतर पोस्ट-प्रॉडक्शनची कामे पूर्ण करून २०२७ मध्ये प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. याशिवाय, पहिल्या भागाप्रमाणेच संगीतावरही विशेष भर दिला जाणार असून, कलाकार आणि इतर तांत्रिक टीमबाबतची अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपटप्रेमींमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Related Posts

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page