Bhau Kadam: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय विनोदी अभिनेता भाऊ कदम यांनी अलीकडेच त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाची आठवण सांगितली. ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीवरील कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेले भाऊ कदम आज लोकप्रिय असले तरी त्यांच्या प्रवासामागे संघर्षाची कहाणी दडली आहे.
अभिनेता म्हणून प्रसिद्ध होण्याआधी भाऊ कदम यांनी अनेक नाटकं आणि एकांकिकांमधून आपला पाया मजबूत केला. पण त्यांचा आयुष्याचा सर्वात मोठा धक्का म्हणजे वडिलांचं अचानक झालेलं निधन. नुकत्याच ‘मित्र म्हणे’ या युट्युब चॅनलवरील मुलाखतीत त्यांनी हा प्रसंग सांगताना भावना आवरल्या नाहीत.
भाऊ कदम म्हणाले, “मी कॉलेज करेपर्यंत वडील नोकरीला होते. त्यामुळे मला कामाची गरज नव्हती. पण ते रिटायर झाले आणि दुसऱ्याच दिवशी गेले. सगळी जबाबदारी माझ्यावर आली. घर चालवायचं कसं हेच माहीत नव्हतं. लाईट बिल, पाणी बिल — काहीच माहिती नव्हतं, कारण आधी कंपनी सगळं भरायची.”
ते पुढे म्हणाले, “वडील कधीच कोणाच्या बाईकवर बसले नव्हते. पण रिटायर होण्याच्या काही दिवस आधी ते अपघातात जखमी झाले. कमरेचं हाड सटकलं आणि त्यानंतर त्यांची तब्येत खालावली. रिटायरमेंटच्या दिवशी सही केली आणि दुसऱ्या दिवशी ते गेले. त्यांनी आयुष्यभर मेहनत घेतली पण सुख पाहिलं नाही.”
वडिलांच्या निधनानंतर भाऊ कदम काही महिने काहीच काम करू शकले नाहीत. शेवटी त्यांनी वडिलांच्या पैशातून डोंबिवलीत घर आणि दुकान घेतलं, आणि उपजीविकेसाठी चार-पाच वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या. नंतर नाटकांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा उभारी घेतली आणि आज ते मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील ओळखीचं नाव आहेत.
भाऊ कदम यांनी पुढे जाऊन मनोज बाजपेयींसोबत ‘इन्स्पेक्टर झेंडे’ या हिंदी चित्रपटात काम केलं आहे. त्यांच्या मेहनतीने आणि संघर्षाने आज ते विनोदासोबत प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जातात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
