Ajanta Verul International Film Festival 2026: जगभरातील निवडक आणि दर्जेदार चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणारा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लवकरच सुरू होत आहे. या महोत्सवाच्या ११ व्या पर्वाच्या तारखा आयोजकांनी जाहीर केल्या आहेत.
हा महोत्सव बुधवार, २८ जानेवारी ते रविवार, ०१ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर आणि आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
महात्मा गांधी मिशन, नाथ ग्रुप, यशवंतराव चव्हाण सेंटर आणि मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जातो. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे सहकार्य या महोत्सवाला लाभले असून एनएफडीसी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांची सहप्रस्तुती आहे.
जागतिक दर्जाचे चित्रपट मराठवाड्यातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि नवोदित कलाकारांना एक व्यासपीठ मिळावे, तसेच मराठी सिनेमा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक भक्कमपणे पोहोचावा, हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे. याच माध्यमातून छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख सांस्कृतिक केंद्र आणि प्रोडक्शन हब म्हणून वाढावी, अशी अपेक्षाही आयोजकांनी व्यक्त केली आहे.
यंदाच्या महोत्सवात पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार, सुवर्ण कैलास सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार, भारतीय आणि जागतिक सिनेमा विभाग, रेट्रोस्पेक्टिव्ह, ट्रिब्युट, मास्टर क्लास, विशेष व्याख्यान, परिसंवाद, स्पेशल स्क्रिनिंग आणि पोस्टर प्रदर्शन असे विविध उपक्रम होणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.
या चित्रपट महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, फेस्टिव्हल डायरेक्टर सुनील सुकथनकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि निमंत्रक नीलेश राऊत यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
