रोमँटिक हिरो म्हणून ओळखला जाणारा आदिनाथ कोठारे बऱ्याच दिवसांनी छोट्या पडद्यावर परतला आहे. त्याची नवीन मालिका ‘नशिबवान’ स्टार प्रवाहवर सुरु झाली आहे. अभिनेत्री नेहा नाईक यात मुख्य भूमिका करत असून, ही तिची पहिलीच मालिका आहे. विशेष म्हणजे ही मालिका आदिनाथच्या स्वतःच्या कोठारे व्हिजन या बॅनरखाली तयार झाली आहे.
हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये व्यस्त असतानाही आदिनाथने ही मालिका करण्याचा निर्णय कसा घेतला, याबद्दल त्याने स्वतः किस्सा सांगितला. एका मुलाखतीत तो म्हणाला, “गेली दोन-तीन वर्ष मी चांगल्या मालिकेच्या शोधात होतो. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा विविध भूमिकांमध्ये काम करत होतो. पण नट म्हणून एक चांगली मालिका करण्याची इच्छा होती.”
तो पुढे म्हणाला की, मालिकेचं कास्टिंग सुरु झालं तेव्हा पहिल्यांदा खलनायक ठरला. त्यानंतर नायिकेसाठी सतीश राजवाडे यांनी नेहा नाईकचं नाव सुचवलं आणि तिची निवड झाली. पण हिरो मात्र ठरत नव्हता. पहिला प्रोमो शूट झाला तेव्हाही आणि शूटिंग सुरु झाल्यावरदेखील हिरो ठरला नव्हता.
आदिनाथ म्हणाला, “एकदा आमच्या कंपनीची सीईओ चार्वीने मला विचारलं – ‘आदिनाथ, तूच का नाही करत?’ मग मी घरी बोललो, चर्चा केली. सतीश राजवाडेंना फोन केला आणि विचारलं की मी करू का? तेव्हा त्यांनी दोन सेकंद शांत राहून विचारलं – ‘तुला खात्री आहे?’ मी लगेच होकार दिला. आणि अशा प्रकारे मीच या मालिकेचा हिरो ठरलो.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
